जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातील कॅम्प भागात फुटपाथवर राहणाऱ्या कॅप्टन रवींद्रकुमार बाली यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आलं असून हत्या सिगारेट पेटवायला काडेपेटी दिली नाही म्हणून झाल्याचं समोर आलंय.
या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रॉबीन अँथोनी लाझरस नावाच्या एकवीस वर्षांच्या तरुणाला अटक केलीय, तो एका BPO मध्ये काम करत असल्याचंही समोर आलंय.
एक फेब्रुवारीला रात्री उशीरा तो दारुच्या नशेत गाडीवर जात होता. त्याची गाडी लष्कर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर बंद पडली. त्यानंतर त्याने सिगारेट पेटवण्यासाठी रस्त्याच्या कडेला तंबूमध्ये झोपलेल्या कॅप्टन रवींद्रकुमार बाली यांना उठवून त्यांच्याकडे काडेपेटी मागितली.
मात्र, बाली यांनी काडेपेटी देण्यास नकार दिल्याने चिडून रॉबीन लाझरसने फुटपाथच्या कडेला असलेली सिमेंटची वीट बाली यांच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये 65 वर्षीय बालींचा मृत्यू झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.