‘लबाड लांडगा ढोंग करतोय’

‘लबाड लांडगा ढोंग करतोय’

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : टोल बंदची घोषणा करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आषीश शेलार यांनी निशाणा साधला. गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, २६ जुलैला तर अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. झाड पडून काहीजण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले, तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते की, मुंबईकरहो तुम्हाला सेवा देण्यात आम्ही, मी कमी पडलो. तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा. आणि आज सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका. हे मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग आहे. लबाड लांडगा ढोंग करतोय आणि मुंबईच्या कैवाराचे सोंग करतोय, असे टीकास्त्र आशीष शेलार यांनी सोडले!

मुंबई महापालिकेत औषधाच्या नावावर होत असलेल्या लुटीबद्दल गेली २० वर्षे आम्ही सातत्याने बोलत आहोत. मुंबई शहराची लोकसंख्या दीड कोटीच्या आसपास आहे. त्यातील ४०-४५ लाख मुंबईकर महापालिकेच्या रुग्णालयांत औषधोपचार घेतात आणि एका वर्षाला चार हजार कोटी खर्च होत आहेत. म्हणजे पाच वर्षाला २० हजार कोटी खर्च होत आहेत. तरीही औषधे मिळत नाही. त्याची क्वॉलिटी योग्य नाही. टेस्ट होत नाहीत. या सर्वांची चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी केल्यानेच आता चौकशी होत असल्याचे शेलार म्हणाले.

मुंबईतील पाऊस, कोविड आणि प्रकल्पांवरून आदित्य ठाकरेंवर शेलारांनी टीका केली. “श्वेतपत्रिकेवरुन जे उघड झाले, तेच आम्ही सांगत होतो. वेदांता आणि फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता. त्यांच्यासोबत कुठलाही करार झाला नव्हता. तरीही ‘ते'(आदित्य ठाकरे) ‘प्रकल्प गेला..प्रकल्प गेला’ असे गळे काढत होते. याचे वर्णन ‘लबाड लांडगा ढोंग करतोय’ असेच करावे लागेल,” असा टोला शेलारांनी लगावला.”महाराष्ट्राची मागील अडीच वर्षे जी वाया गेली, त्या काळातील कवित्व महाराष्ट्र आजही विसरणार नाही. कोविडबाबत वैज्ञानिक नाही, तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते,” असा टोला शेलारांनी लगावला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version