तनुश्रीच्या तक्रारीची महिला आयोगकडून दखल, नाना पाटेकर यांना नोटीस!

तनुश्रीच्या तक्रारीची महिला आयोगकडून दखल, नाना पाटेकर यांना नोटीस!

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे 8 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीची आयोगाने दखल घेतली आहे. तनुश्री दत्ताची लेखी तक्रार त्यांच्यावतीने वकिलामार्फत सादर करण्यात आल्याने या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनुश्री दत्तानी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश देण्यात आले आहेत.

तनुश्री दत्ताच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावत 10 दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे प्रत्यक्षपणे मांडावे, असे निर्देश दिले आहेत.    

तनुश्री दत्ताने आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबत आत्तापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल आयोगाने मागवला आहे.

सिनेसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसंच संबंधित संघटनांचीदेखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी असे निर्देश आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version