छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित कोट्यवधी रुपयांची शिवसृष्टी उभारण्याच्या वल्गना करणाऱ्या पुणे महापालिकेने, गेल्या चार वर्षांपासून सुशोभिकरणाच्या नावाखाली पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा लालमहाल बंद ठेवला आहे़.
निधीच्या अर्धवट तरतुदी, निधी उपलब्ध करूनही त्याचा वेळेत उपयोग न करणं, काम पूर्णत्वास नेण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हा लालमहाल पुणेकरांसह शहराबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना केवळ दूरून दर्शन साजरे असाच ठरतोय.
सध्या या लालमहालाला कुलूप लावण्यात आलंय.
शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतील महत्त्वपूर्ण आणि शाहिस्तेखानाची बोटे जेथे छाटली गेली असा हा लालमहाल इतिहासाच्या पुस्तकातून संपूर्ण जगासमोर आहे.
मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून तो अनेक वादांमध्ये पोलीस बंदोबस्तात व काटेरी तारांच्या कुंपणातच राहिला.
एका वर्षाच्या आत सुशोभित व दुरुस्ती केलेला लालमहाल पर्यटकांसाठी उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं होतं.
मात्र गेल्या 4 वर्षांपासून लाल महालाबाहेरील ‘सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम चालू असल्याने लालमहाल बंद आहे’ हा फलकच पर्यटकांना दिसतोय.
2015-16 च्या अर्थसंकल्पातील तरतुदीनंतर पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली़. मात्र, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे व टेंडर प्रक्रियेतील कासवगती यामुळे हा निधी पूर्णपणे वेळेत खर्च झाला नाही़.
महापौर मुक्ता टिळक यांना या बद्दल विचारले असता याविषयी त्यांना काहीच माहिती नाही, असं सांगून बोलण्यास नकार दिला.
मात्र संभाजी ब्रिगेडने काल महापालिकेत सर्वसाधारण सभेत आंदोलन करत महापौर यांना जाब विचारला. त्यानंतर सद्य:स्थितीला पालिकेच्या भवन विभागाकडून लालमहालाच्या नुतनीकरणाचे 80% काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतोय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.