Kolhapur: अधिक मासात जावयाचा अनोखा थाट! सासरच्यांनी भेट दिली तब्बल दीड किलो वजनाची चांदीची कोल्हापुरी चप्पल

कोल्हापूरातील एका कुटुंबाने अधिक मासाच्या वाणासाठी जावयाला तब्बल दीड किलो वजनाची चांदीची कोल्हापुरी चप्पल भेट दिली आहे.
Kolhapur: अधिक मासात जावयाचा अनोखा थाट! सासरच्यांनी भेट दिली तब्बल दीड किलो वजनाची चांदीची कोल्हापुरी चप्पल

राज्यात सोन्या-चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या असतानाही कोल्हापूरातील एका कुटुंबाने आपल्या जावयासाठी खास आणि आगळावेगळा मान राखत तब्बल दीड किलो वजनाची चांदीची कोल्हापुरी चप्पल तयार करून घेतली आहे. अधिक मासानिमित्त जावयाला वाण देण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाळली जाते. मात्र, यावेळी कोल्हापुरात तयार झालेल्या या चांदीच्या चप्पलची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसरीचा सल्ला देत सोन्या-चांदीच्या खरेदीवर संयम ठेवण्याचे आवाहन केले होते. इंधन बचत आणि खर्च कमी करण्यावरही भर देण्यात आला होता. अशा परिस्थितीत कोल्हापुरातील या अनोख्या भेटवस्तूमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महागाई वाढली असली तरी हौस आणि परंपरेसाठी लोक खर्च करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचं या घटनेतून दिसून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील एका कुटुंबाने आपल्या जावयासाठी विशेष वाण म्हणून ही चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. सध्या बाजारात चांदीचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला असून प्रतिकिलो चांदीची किंमत जवळपास पावणेतीन लाख रुपयांच्या घरात आहे. अशा वेळी तयार करण्यात आलेल्या या चप्पलसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. ही चप्पल तयार करण्यासाठी जवळपास दीड किलो चांदीचा वापर करण्यात आला. कोल्हापूरचे कारागीर विक्रांत माळी यांनी आठ दिवस मेहनत घेत ही आकर्षक कोल्हापुरी चप्पल तयार केली. चप्पल तयार करण्यासाठी सुमारे चार लाख रुपयांची चांदी वापरण्यात आली असून मजुरीसाठी सुमारे 22 हजार रुपये खर्च झाले आहेत. जीएसटीसह या चप्पलची एकूण किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात गेल्याचे सांगितले जात आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version