कोल्हापूर: सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिक घातक होत असताना कोल्हापुरातून डिजिटल अरेस्टचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. कायद्याची भीती, पोलिसी आवाज आणि न्यायालयीन वातावरणाचा आभास निर्माण करत सायबर भामट्यांनी एका निवृत्त प्राध्यापकाला मानसिक दबावाखाली ठेवत तब्बल 78 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील तेराव्या गल्लीत राहणाऱ्या एका वयोवृद्ध निवृत्त प्राध्यापकासोबत घडली.
29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत हा सायबर सापळा हळूहळू वाढत गेला. सुरुवात एका साध्या फोन कॉलने झाली. फोनवरील व्यक्तीने तुमच्या मोबाईल सिमचा गैरवापर झाला असून काही तासांत सिम बंद होणार असल्याचे सांगितले. याच एका वाक्याने पुढील भयावह घटनांची मालिका सुरू झाली. फोन करणाऱ्याने स्वतःला मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यातील अधिकारी असल्याचे भासवले. काही वेळातच व्हॉटसअपवर व्हिडीओ कॉल आला. समोर पोलिस ठाण्यासारखा सेट, गणवेशातील अधिकारी, फाइल्स आणि कॅमेऱ्यासमोर बसलेला कथित वरिष्ठ अधिकारी दिसत होता. हे दृश्य इतके वास्तवदर्शी होते की प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीला कोणताही संशय घेण्याची संधीच मिळाली नाही. तुमच्या आधारकार्डचा वापर 538 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
यानंतर भामट्यांनी नरेश गोयल नावाच्या कथित आरोपीचे फोटो पाठवून भीती अधिक वाढवली. सहकार्य न केल्यास डिजिटल अरेस्ट करण्यात येईल, घराबाहेर पडता येणार नाही आणि बँक खातं सील केलं जाईल, अशा धमक्या देण्यात आल्या. यानंतर सुरू झाला मानसिक छळाचा अमानवी खेळ. दिवसभर वयोवृद्ध दांपत्याला व्हॉटसअप आणि व्हिडीओ कॉलवर गुंतवून ठेवण्यात आले. न्यायालयाची बनावट सुनावणी, न्यायाधीशांचा आभास, बँक खात्यांची चौकशी अशा सगळ्या गोष्टी चित्रपटासारख्या वाटत होत्या, मात्र त्या भयावह वास्तवासारख्या भासत होत्या. या सततच्या दबावाखाली प्राध्यापकांना आरटीजीएस आणि नेट बँकिंगद्वारे टप्प्याटप्प्याने 78 लाख 90 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडण्यात आले. खात्यातील संपूर्ण रक्कम संपल्यानंतरही भामटे थांबले नाहीत. अखेर प्राध्यापकांनी मित्रांकडून मोठी रक्कम उसनवार मागितल्यावर मित्रांना संशय आला. त्यानंतर या सायबर फसवणुकीचा भांडाफोड झाला.
तक्रार दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँक खात्यांमधील 16 लाख 45 हजार रुपयांची रक्कम तातडीने थांबवण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात शहरातील पाच निवृत्त अधिकारी आणि प्राध्यापकांना अशाच पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली आहे.
हा प्रकार केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नाही. भीती, विश्वास आणि कायद्याच्या नावाखाली खेळलेला हा अत्यंत धोकादायक मानसिक खेळ आहे. डिजिटल अरेस्टचा हा सायबर सापळा कोणालाही अडकवू शकतो. त्यामुळे अशा कॉल्सपासून सतर्क राहणं आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणं हीच खरी सुरक्षा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.