Ketan Agarwal Case : सिया-चेतनची लाय डिटेक्टर चाचणी कोर्टाने नाकारली; सियाच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद; मिळवली न्यायालयीन कोठडी

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
Ketan Agarwal Case : सिया-चेतनची लाय डिटेक्टर चाचणी कोर्टाने नाकारली; सियाच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद; मिळवली न्यायालयीन कोठडी

Ketan Agarwal Murder Case :  पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे सांगत त्यांची आणखी 3 दिवसांची कोठडी वाढवून मागितली होती. मात्र, न्यायालयाने पोलिसांची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावत दोन्ही आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यामुळे आता आरोपींचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संमतीशिवाय चाचणी अशक्य असल्याचे कोर्टाने सुनावले
तपासादरम्यान पोलीस आरोपींची लाय डिटेक्टर म्हणजेच पॉलिग्राफ टेस्ट घेण्याच्या विचारात होते आणि त्यासाठी संभाव्य प्रश्नांची एक यादीही तयार करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने या चाचणीसाठी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पोलिसांचे कानही टोचले. पॉलिग्राफ टेस्टसाठी आरोपींची स्वतःची संमती असणे अत्यंत आवश्यक आहे आणि या प्रकरणात अशी कोणतीही सहमती नसल्याने ही चाचणी करता येणार नाही, असे न्यायालयाने पोलिसांना सुनावले. तसेच या चाचणी संदर्भातील पुढील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा – Gujarat ATS : गुजरात ATS ची मोठी कारवाई; 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेच्या 8 सदस्यांना अटक

कोर्टातील युक्तिवाद आणि वकिलांचे आक्षेप
न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आरोपीचे वकील विपुल दुशिंगे यांनी युक्तिवाद केला की, पोलिसांचे मुद्दे चुकीचे आणि विसंगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही आरोपीला स्वतःच्याच विरोधात पुरावे देण्यासाठी पोलीस प्रवृत्त करू शकत नाहीत. चेतनच्या वकिलांनी आक्षेप घेतला की, पोलिसांचा हा तपास अत्यंत मोघम आणि संशयास्पद वाटतो. गेल्या 12 दिवसांच्या तपासात पोलिसांच्या हाती नेमके काय लागले? वकिलांनी पुढे म्हटले की, कायद्यानुसार 14 दिवसांची कस्टडी मिळते म्हणून उरलेले दिवस कस्टडी द्या, अशी मागणी करणे हास्यास्पद आहे.

कोठडी वाढवून घेण्यासाठी कोणतेही कायदेशीर कारण नाही
आरोपींच्या वकिलांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की पोलिसांनी आधीच पुरेसा वेळ घेतला असून त्यांच्याकडे कोठडी वाढवून घेण्यासाठी कोणतेही ठोस आणि कायदेशीर कारण शिल्लक नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांना आता या प्रकरणात तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेच आपले दोषारोपपत्र मजबूत करावे लागणार आहे.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar: सातबारा नोंदीसाठी संघर्ष; पैठण तहसील कार्यालयात महिलेने उचललं टोकाचं पाऊल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version