कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) सेवेवर मंगळवारी मोठा परिणाम झाला. कंत्राटी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी वेतनातून परस्पर कपात करण्यात आल्याचा आरोप करत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने KDMT ची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, डेपोतून एकही बस मार्गावर धावली नसल्याने हजारो प्रवाशांना सकाळपासून मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या पगारातून रक्कम वजा केली. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, वेतन कपातीबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. वेतन कपातीसंदर्भात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराकडे लेखी स्वरूपात खुलासा मागण्यात आला होता. मात्र, याबाबत कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत असंतोष व्यक्त करत अखेर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाचा थेट परिणाम KDMT च्या दैनंदिन बससेवेवर झाला आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरातील विविध मार्गांवरील बसफेऱ्या रद्द झाल्याने कामावर, शाळा-महाविद्यालयात आणि इतर कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे खासगी वाहनांसह रिक्षा आणि इतर सार्वजनिक वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी कामगारांवर अन्याय करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी त्यांनी केली. उल्हास भोईर यांनी प्रशासनाला इशाराही दिला आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आणि थकीत वेतनाचा प्रश्न निकाली काढला नाही, तर संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला KDMT डेपोमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, या आंदोलनावर महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार काय भूमिका घेतात, बससेवा पूर्ववत कधी सुरू होते आणि प्रवाशांची गैरसोय कधी दूर होणार, याकडे कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.