शेतीला जोडधंदा म्हणून कडकनाथ कुक्कुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र या गुंतवणुकीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याच्या नावाखाली सांगली जिल्ह्यातील एका कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो शेतकर्यांची लूट या कंपनीने केली आहे. गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकत नसल्याने राज्यातील अनेक कार्यालयांना टाळं ठोकून कंपनीचे संचालक फरार झाले आहेत.
सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवत गुंतवणुकीची भन्नाट योजना सुरू केली.
‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी आणि कोंबड्या विका’ असं या योजनेचं स्वरुप आहे.
यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
पक्षी घेताना 40 हजार आणि राहिलेले 35 हजार 3 महिन्यांनतर अशा दोन टप्प्यांत रक्कम घेतली जाते.
या कालावधीत 200 पक्ष्यांच्या युनिटसाठी कंपनीकडून खाद्य, औषधं, लस, भांडी दिली जातात.
तीन महिन्यानंतर कंपनी शेतकर्याकडे 100 मादी आणि 20 नर ठेवून 80 पक्षी घेऊन जाते.
4 ते 5 महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणं सुरू केल्यानंतर कंपनी पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50 , दुसरी दोन हजार अंडी 30 व तिसरी 3500 अंडी 20 रुपये या दराने घेऊन जाते.
यातून शेतकर्याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे दोन लाख देण्याचं आमिष दाखवण्यात आलं.
75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसंच दोन टप्प्यांत रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले.
कंपनीच्या संचालकांनी सुरवातीला पहिल्या सहा महिन्यात हा फंडा वापरून सांगली, सातारा जिल्ह्यांतील काही शेतकर्यांना परतावा दिला.
विश्वास संपादन झाल्याने शेतकर्यांचा गुंतवणुकीचा ओघ वाढत गेला.
पहिल्या, दुसर्या टप्प्यातील शेतकर्यांकडून मिळालेले पक्षी इतरांना देऊन कंपनीने आपला पसारा राज्यभर वाढविला.
एजंट्समार्फत अनेक शेतकर्यांना कोंबड्या पाळायला लावल्या.
बहुसंख्य ठिकाणी पॉश कार्यालये थाटून, यशोगाथा सांगून सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, माढा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर यासह अनेक ठिकाणी जाळं पसरलं.
या आमिषाला भुलून हजारो शेतकर्यांनी रक्कम गुंतविली.
या प्रकल्पात उत्पादित झालेली अंडी व पक्षी पंचतारांकित हॉटेलात मोठ्या भावाने जात असल्याची हाकाटी पिटण्यात आली. पण प्रत्यक्षात त्यांची विक्रीच होत नव्हती.
तर उत्पादित झालेली अंडी आणि पक्षी गुंतवणूक करणार्या इतर शेतकर्यांना दिले जात होते.
विक्रीच होत नसल्याने आणि प्रकल्पास गुंतवणूक कमी होऊ लागल्याने पुढे चालणारी साखळी ठप्प झाली.
परिणामी शेतकर्यांना दिल्या जाणारा परताव्याची उधारी वाढू लागली.
हळूहळू शेतकर्यांची थकित रक्कम वाढत गेली.
दररोज शेकडो शेतकरी या कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे घालू लागले.
यामुळे कंपनीचे बिंग फुटले आहे. देणेकर्यांची संख्या व रक्कम वाढू लागल्याने कंपनीच्या संचालकांनी कार्यालयांना कुलूप ठोकून पोबारा केला. यामुळे शेतकर्यांचे धाबे दणाणले आहेत.
सुमारे 8 हजार शेतकर्यांचे सुमारे 300 ते 400 कोटी रुपये यात अडकले असल्याची प्राथमिक शक्यता आहे. काही शेतकर्यांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून कंपनीचे संचालक गायब झाले आहेत. संचालक व कर्मचार्यांचे मोबाईल बंद आहेत. दोन महत्वाचे संचालक पुण्यात असल्याची चर्चा आहे.
महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा सुधीर मोहिते यांनी मात्र कोणताही घोटाळा झाला नसल्याचं म्हटलंय.
सर्व गोष्टींना मी स्वतः जबाबदार आहे. मी कोणत्याही चौकशीसाठी सामोरे जायला तयार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करावयाची काहीही गरज नाही. लवकरात लवकर कंपनीचं कामकाज पूर्ववत होईल, असं सांगणारा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.