JJ Hospital Doctor Strike : मुंबईची आरोग्य व्यवस्था कोलमडणार? विविध मागण्यांसाठी आजपासून जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू

आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्या तरी ओपीडी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
JJ Hospital Doctor Strike : मुंबईची आरोग्य व्यवस्था कोलमडणार? विविध मागण्यांसाठी आजपासून जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू

मुंबईत आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शहरातील ऐतिहासिक आणि राज्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या जे जे रुग्णालयात आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होत आहे. प्रशासनाकडून प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सुमारे 200 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास सर्व निवासी डॉक्टर एकत्र येऊन त्यांच्या विविध मागण्या रुग्णालय प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहेत. वेतनवाढ, भत्ते, निवास आणि इतर मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न प्राधान्याने मांडले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. “उपाशी पोटी न्यायाची लढाई” या भूमिकेतून डॉक्टरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: India Clarified To US: रशियाकडून तेल खरेदी थांबवली? अमेरिकेच्या दाव्यावर भारताने दिले सडेतोड उत्तर, ‘ आम्हाला कुणीही …’

या आंदोलनाचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्कालीन विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) तसेच इतर नियमित सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दररोज हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या या रुग्णालयात आजपासून परिस्थिती तणावपूर्ण राहू शकते. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी दिलेली आहे. 

यापूर्वीही निवासी डॉक्टरांनी उपोषण आणि कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, त्यानंतरही अनेक मागण्या प्रलंबितच राहिल्याचा आरोप डॉक्टरांकडून केला जात आहे. आरोग्य यंत्रणेतील दुर्लक्षाचे परिणाम आता थेट जनतेलाच भोगावे लागू शकतात, अशी चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या Sir J. J. Group of Hospitals मधील हे आंदोलन केवळ स्थानिक प्रश्न न राहता व्यापक आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे ठरू शकते. आता “रुग्णसेवा की आंदोलन?” या द्वंद्वात तोडगा कधी आणि कसा निघतो, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Mumbai Air Pollution: मुंबईकरांना श्वास घेणंही कठीण! वांद्रे खेरवाडीत हवा ‘अतिवाईट’; प्रदूषणाने मोडला विक्रम

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version