भारताला वर्ल्ड कप 2025 जिंकवून देणारी स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्स पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मैदानावरील चमकदार प्रदर्शनानंतर आता तिने केलेला एक वैयक्तिक खुलासा चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. उपांत्य फेरीतील शतकानंतर अचानक वाढलेल्या प्रचंड लक्षामुळे आणि सतत येणाऱ्या मेसेज कॉल्समुळे तिला थेट तिचे WhatsApp डिलीट करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.
जेमिमाने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीतील 127 धावांच्या नाबाद खेळी नंतर तिचा फोन अक्षरशः न थांबता रिंग होत होता. अनोळखी लोकांकडूनही मेसेज, कॉल्स येऊ लागले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. “मी जास्त वाढवून सांगत नाही… मला जवळपास एक हजार WhatsApp मेसेज मिळाले होते. अनोळखी नंबरवरूनही सतत कॉल येत होते. मी घाबरले. टूर्नामेंट संपली नव्हती, फायनल बाकी होती… त्यामुळे मन एकाग्र ठेवायला मला ताबडतोब काहीतरी करावं लागणार होतं.” असे जेमिमा म्हणाली.
ती पुढे म्हणाली, “एक क्षण असा आला की जाणवलं, हे सगळं आता खूपच वाढत चाललं आहे. म्हणून मी थेट WhatsApp डिलीट केलं. माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं की गरज असेल तर साधा मेसेज किंवा कॉल करावा. फायनल संपेपर्यंत मी सोशल मीडियाकडे गेलेच नाही.” भारताने विश्वविजेतेपद पटकावताच जेमिमाने पुन्हा सोशल मीडिया सुरू केले. त्यावेळी तिच्या फोनवर काय दिसलं याचे वर्णन करत ती म्हणाली “इंस्टाग्राम उघडताच फक्त आपल्या टीमच्या विजयाचे रील्स दिसत होते. माझ्याच खेळीचे व्हिडिओ सगळीकडे फिरत होते. लोक काय काय बोलत होते ते पाहून विश्वासच बसत नव्हता. आजही जेव्हा Instagram उघडते, तेव्हा सर्वात आधी माझाच व्हिडिओ दिसतो.”
विश्वचषकातील जेमिमाची तोफ 2025 च्या विश्वचषकात जेमिमाने जबरदस्त कामगिरी करत सात डावांमध्ये 58 पेक्षा जास्त सरासरीने 292 धावा केल्या. नऊ चेंडू शिल्लक ठेवून मिळवलेला हा विजय भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला. जेमिमाची ही कबुली पुन्हा एकदा दाखवून देते की चमकदार यशाच्या मागे मानसिक ताण, दडपण आणि जबाबदारीही मोठ्या प्रमाणात असते. तरीही सोशल मीडियापासून दूर राहून अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा तिचा निर्णय भारतीय संघाला जागतिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.