जालना: जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित आंदोलकाच्या कमरेत एका पोलीस उपाधीक्षकाने फिल्मी स्टाईलने लाथ मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओ अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या होत्या. यावेळी, उपोषणकर्त्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यानंतर, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लाथ मारली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकजण संतापले.
उपोषणकर्त्यांचा जालना पोलिसांवर गंभीर आरोप
या प्रकरणी, उपोषणकर्ता गोपाल चौधरी यांनी कदीम जालना पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. ते म्हणाले की, 'माझ्या सासरच्यांनी माझ्या पत्नीचं दुसऱ्याशी लग्न लावून दिलं. यामुळे, मी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिस पैसे खाऊन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. तसेच, माझ्या वडिलांना चौकशीसाठी बोलावून मारहाण केली'.
पुढे त्यांनी असा आरोप केला की, 'पोलिसांची फौज आमच्या अंगावर आली. आरोपींना अटक करा आणि न्यायालयात हजर करा इतकीच माझी मागणी आहे. आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करू'.
पोलीस उपाधीक्षकांची प्रतिक्रिया
पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले की, 'जालन्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलकाने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकल्याने बळाचा वापर केला. गेल्या काही दिवसांपासून गोपाल चौधरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या पत्नीने दुसरे लग्न केल्याने तिला परत आणावे, अशी मागणी ते करत आहे. यादरम्यान, पोलिसांनी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.