मुंबई: भारतीय शेअर बाजारातील दिग्गज FMCG कंपनी ITC लिमिटेडसाठी सरत्या वर्षाची अखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत खडतर ठरली आहे. केंद्र सरकारने सिगारेटवर नवीन उत्पादन शुल्क (Excise Duty) लागू करण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला असून, अवघ्या दोनच दिवसांत ITC चे शेअर्स 14 टक्क्यांनी कोसळले आहेत. या मोठ्या घसरणीमुळे कंपनीच्या बाजार भांडवलात (Market Cap) सुमारे 72,000 कोटी रुपये इतकी प्रचंड घट झाली आहे.
सरकारचा निर्णय आणि विक्रीचा सपाटा
बुधवारी रात्री उशिरा अर्थ मंत्रालयाने सिगारेटवर 1 फेब्रुवारीपासून नवीन उत्पादन शुल्क लागू करण्याची अधिसूचना जारी केली. यानुसार, सिगारेटच्या लांबीनुसार प्रति 1000 स्टिक्सवर 2,050 ते 8,500 रुपये इतकी वाढ सुचवण्यात आली आहे. या निर्णयामुळे गुरुवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी ITC च्या शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा लावला. एका क्षणी हा शेअर 345.25 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तज्ज्ञांच्या मते, या कर वाढीमुळे कंपनीला प्रति सिगारेट दोन ते पाच रुपयांची वाढ करावी लागेल, ज्याचा परिणाम मागणीवर होऊ शकतो.
सर्वात मोठा फटका LIC ला
ITC च्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीत कोणताही ‘प्रमोटर’ नाही. संपूर्ण 100 टक्के हिस्सा सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे असून, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ही यामध्ये 15.86 टक्के हिश्श्यासह सर्वात मोठी भागधारक आहे. 31 डिसेंबरपर्यंत LIC च्या या हिस्सेदारीचे मूल्य सुमारे 80,028 कोटी रुपये होते, जे दोन दिवसांच्या घसरणीनंतर 68,560 कोटी रुपये इतके राहिले आहे. म्हणजेच, या एका निर्णयामुळे LIC ला कागदोपत्री 11,468 कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
गुंतवणूकदारांची चिंता आणि ब्रोकरेजचा इशारा
गेल्या सहा महिन्यांपासून सुस्त असलेल्या या शेअर्समध्ये अचानक आलेल्या घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदार धास्तावले आहेत. अनेक मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी ITC वरील त्यांचे रेटिंग आता कमी केले आहे. वाढत्या कराचा बोजा ग्राहकांवर टाकल्यास सिगारेटच्या खपात घट होईल आणि त्याचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 13 टक्क्यांनी, तर गेल्या सहा महिन्यांत 15 टक्क्यांनी घसरला आहे.
बाजार बंद होताना काहीशी सुधारणा
गुरुवारी व्यवहारात मोठी पडझड झाल्यानंतर शुक्रवारी बाजार बंद होताना शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळाली. सत्राच्या शेवटी ITC चा शेअर 350.10 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. मात्र, अजूनही अनिश्चिततेचे ढग कायम आहेत. सिगारेट व्यवसायावर असलेले अवलंबन कमी करण्यासाठी कंपनी आपल्या हॉटेल आणि इतर व्यवसायांवर किती भर देते, याकडे आता तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.