Monsoon 2026 Prediction: बळीराजाचं टेन्शन वाढलं! मान्सूनवर ‘एल निनो’चं गडद सावट; यंदा पाऊस सरासरीपेक्षा…

सध्याचे 'सायक्लोनिक सर्क्युलेशन' आणि 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' भारताच्या वातावरणात सातत्याने बदल घडवून आणत आहेत.
Monsoon 2026 Prediction: बळीराजाचं टेन्शन वाढलं! मान्सूनवर ‘एल निनो’चं गडद सावट; यंदा पाऊस सरासरीपेक्षा…

मुंबई: गेल्या वर्षी आभाळ फाटलं होतं आणि 'पावसाला नको' असं म्हणण्याची वेळ आली होती. मात्र, यंदा परिस्थिती नेमकी उलटी होण्याची चिन्हे आहेत. ज्या पावसाने गेल्या वर्षी ओसंडून वाहून सर्वांना जेरीस आणले, तोच पाऊस यंदा मात्र डोळे वटारणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने 2026 च्या मान्सूनबाबत आपला पहिला अंदाज जाहीर केला असून तो चिंतेत भर टाकणारा आहे. यंदा देशात सरासरीच्या तुलनेत केवळ 94 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'पावसाळा' म्हटलं की सर्वत्र चैतन्य येतं, पण यंदाच्या अंदाजानुसार हा प्रवास अत्यंत अडखळत आणि विसंगत राहण्याची भीती आहे.

या पावसाच्या लपंडावामागे 'एल निनो' (El Nino) हे सर्वात मोठे जागतिक कारण ठरणार आहे. गेल्या काही काळापासून पावसाला साथ देणारी 'ला निना' स्थिती आता संपुष्टात आली असून प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांच्या मते, नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळातच एल निनोचा प्रभाव अधिक राहील. याचा अर्थ असा की, जेव्हा शेतीसाठी पावसाची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच ढगांची दाटी विरळ होऊ शकते. पावसाचे हे 'अडखळत' येणे शेतीवर मोठे संकट ओढवू शकते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाच्या वेळापत्रकाचा विचार केल्यास, जून महिना तुलनेने स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, खरा पेच जुलै ते सप्टेंबर या मुख्य काळात निर्माण होणार आहे. गेल्या वर्षी पावसाने कहर केला होता, पण यंदा मात्र पावसाचे वितरण हे "विसंगत आणि भेदभाव करणारं" असण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस अधिक अनिश्चित आणि अनियमित राहण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहेत. जूनमध्ये पेरण्या उरकल्यानंतर पिके जोमात येण्याच्या काळातच जर पावसाने पाठ फिरवली, तर बळीराजाच्या डोळ्यांत पाणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Yedeshwari Devi Yatra: येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात; जाणून घ्या 'येडाईच्या परडी'ची परंपरा आणि महत्त्व

मात्र, या निराशेच्या ढगांमागे हिंदी महासागरातून एक आशेचा किरण दिसत आहे. 'इंडियन ओशन डायपोल' सध्या सकारात्मक किंवा तटस्थ राहण्याचा अंदाज आहे. जर आयओडी सकारात्मक राहिला, तर तो एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकतो. म्हणजेच, पावसाळ्याची सुरुवात जरी आश्वासक झाली, तरी दुसऱ्या सत्रात पावसाला 'ग्रहण' लागण्यापासून वाचवण्याची ताकद या हिंदी महासागरातील हालचालींमध्ये आहे. तरीही, दुसऱ्या सत्रात पावसाची अनियमितता ही पाणी व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताला पावसाच्या तुटीचा मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्राचा विचार करता, मध्य महाराष्ट्रातील शेतीसाठी हा काळ परीक्षेचा ठरणार आहे. पावसाचे वितरण हे अत्यंत विसंगत राहण्याची शक्यता असून, एकाच वेळी कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरडा दुष्काळ असे विरोधाभासी चित्र पाहायला मिळू शकते. अशा विसंगत पावसाळ्यामुळे पिकांच्या नियोजनात मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

भारतीय हवामान विभाग (IMD) 15 एप्रिल 2026 नंतर त्यांचा  अधिकृत अंदाज प्रसिद्ध करणार आहे, त्यानंतरच मान्सूनचे नेमके चित्र अधिक स्पष्ट होईल. सध्याचे 'सायक्लोनिक सर्क्युलेशन' आणि 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' भारताच्या वातावरणात सातत्याने बदल घडवून आणत आहेत. एल निनोचा हा अडथळा पार करून मान्सून किती जोमाने बरसेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तुर्तास, पावसाच्या या चिंताजनक अंदाजाने नियोजनाच्या पातळीवर प्रशासनाला आणि कृषी क्षेत्राला आतापासूनच सज्ज राहण्याची आणि पाण्याचा थेंब न् थेंब जपून वापरण्याची गरज अधोरेखित केली आहे. 

हेही वाचा: Electricity Bill : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात वीज दरात होणार मोठी कपात; पाहा तुमचे नवे दर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version