नवी दिल्ली: स्वच्छ इंधनाला चालना देण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून 2025-26 या आर्थिक वर्षात LPG उत्पादनात वाढ झाली आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत LPG उत्पादन 13.1 दशलक्ष टनांवर पोहोचले, तर मागील दोन आर्थिक वर्षांत ते 12.8 दशलक्ष टन इतके होते. मार्च 2026 मध्ये एलपीजीच्या मागणीत मोठी कपात झाली आहे. एकाच महिन्यात 13 टक्क्यांनी खप घटला आहे.
मार्च 2026 हा अपवाद मानला तरी संपूर्ण आर्थिक वर्षात LPG च्या वापरात 6 टक्क्यांची वाढ झाली असून तो 33.212 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांत LPG च्या वापरात सातत्याने वाढ होत आहे. यामागे लाकूड आणि प्रदूषण करणाऱ्या इतर इंधनांच्या ऐवजी स्वच्छ पर्यायांचा वापर वाढवण्याचे सरकारी प्रयत्न हे प्रमुख कारण मानले जात आहे.
दुसरीकडे, युद्धामुळे अनेक आखाती देशांतील हवाई क्षेत्र बंद राहिल्याने आणि उड्डाणांवर परिणाम झाल्याने एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (AviationTurbine Fuel, ATF) म्हणजेच ATF च्या वापरात मार्च महिन्यात फारशी वाढ झाली नाही. मार्चमध्ये ATF ची विक्री 807,000 टन इतकी राहिली, तर मागील वर्षी याच कालावधीत ती 801,000 टन होती.
युद्धाचा परिणाम काही इंधनांवर झाला असला तरी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 7.6 टक्क्यांनी वाढून 3.78 दशलक्ष टनांवर पोहोचली, तर डिझेलचा वापर 8.1 टक्क्यांनी वाढून 8.727 दशलक्ष टनांवर गेला.
संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर ATF विक्रीत 2 टक्क्यांची वाढ होऊन ती 9.161 दशलक्ष टन झाली. पेट्रोलचा वापर 6.5 टक्क्यांनी वाढून 42.586 दशलक्ष टनांवर पोहोचला, तर डिझेलची खपत 3.6 टक्क्यांनी वाढून 94.705 दशलक्ष टन झाली.
औद्योगिक इंधनांमध्ये मात्र घट दिसून आली. नेफ्थाच्या वापरात 9.9 टक्के आणि फ्यूल ऑईलच्या वापरात 1.4 टक्क्यांची घट झाली. मात्र रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या बिटुमेनच्या खपात 3 टक्क्यांची वाढ झाली असून तो 8.84 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे.
हेही वाचा: Darshan Kumar Death: T-Series चे संस्थापक गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.