हुंडाबळीच्या घटनांबाबत गेल्या काही महिन्यांपासून देशभरातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत.अनेक प्रकरणांमध्ये लग्नानंतर काही महिन्यांतच महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. आर्थिक मागण्यांचा ताण, सततचा दबाव आणि कौटुंबिक छळ यामुळे काही प्रकरणे दुर्दैवी टोकाला जात आहेत. अशातच सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पैशासाठी विवाहितेची गळा दाबून हत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्हा मोहोळ तालुक्यातील सारोळे गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोनाली प्रतीक शिंदे या विवाहितेवर तिच्या पती आणि सासूकडून पैशाच्या कारणावरून जाचहाट हट्ट करून छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चार महिन्यापूर्वी सोनाली हिचा विवाह प्रतीक शिंदे यांच्यासोबत लावण्यात आला. मात्र लग्नानंतर पती आणि सासू यांनी 'लग्नाच्या वेळेस टीव्ही दिला नाही, माझा मानपान करून सोन्याची अंगठी घातली नाही. मी एक दोन आठवड्यात वाट बघील, नाहीतर तुमची मुलगी परत आणून सोडील' अशी धमकी दिली होती. मात्र सोनालीच्या आई-वडिलांनी 'आमची परिस्थिती गरीब आहे' असे सांगून वीस हजार रुपये दिले होते.
12 एप्रिल रोजी सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांना पती प्रतीक याचा कॉल आला. त्यावेळेस कॉलवर बोलताना, 'रात्री आम्ही दोघे एकत्र झोपलो होतो, मात्र सोनाली पहाटे उठली नसल्यामुळे आम्ही तिला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात आहोत' असे सांगितले. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केले. मात्र सोनाली हिचा पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पती प्रतीक शिंदे, सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि सासू यांना मोहोळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे प्रशासन आणि सामाजिक संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच हुंडा प्रथेविरुद्ध जनजागृती वाढवण्याची गरज अधोरेखित होत आहे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसू शकेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.