Pune Crime : ऑनलाईन कॅब बुक करून सहलीच्या बहाण्याने चालकाला कोकणात नेऊन त्याला संपवणाऱ्या एका टोळीचा बाणेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आदित्य गणेश भगत (वय 22, रा. भोसरी) असे संपवण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. आरोपींनी पुण्याहून महाबळेश्वरला जाण्यासाठी आदित्यची कॅब बुक केली होती. प्रवासादरम्यान पैशांच्या वादातून आरोपींनी आदित्यचा गळा आवळला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात फेकून दिला.
हेही वाचा – Dhule Crime : धुळ्यात मतदानापूर्वी राडा, शिवसेना उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप
घड्याळावरून ओळख आणि कार विक्रीचा डाव
ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना एक अनोळखी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. माणगाव पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृतदेहाच्या हातातील घड्याळावरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. हत्येनंतर आरोपी आदित्यची कार चोरून ती विकण्याच्या तयारीत होते. बाणेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रीतम निकाळजे गस्तीवर असताना त्यांना मुंबई-बेंगळुरू हायवेवरील ननावरे पुलाजवळ एक संशयास्पद व्यक्ती कार विकण्यासाठी उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून अनिकेत वाघमारे याला ताब्यात घेतले, ज्याच्या चौकशीतून या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.
धावत्या ट्रेनमध्ये आरोपीला बेड्या
या प्रकरणातील मुख्य आरोपी सोन्या उर्फ प्रज्वल संतोष हंबीर हा सोलापूरहून पुण्याला येत असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये सापळा रचला. पोलीस पथकाने 'D-7' डब्यातून प्रज्वलला धावत्या ट्रेनमध्ये झडप घालून अटक केली. कटानंतर चालकाची कार विकण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपीसह तिघांना आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.