कल्याणमधील मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीत एक थरारक हत्याकांड समोर आले आहे. एका फ्लॅटच्या बाथरूममध्ये गोणीत बांधलेला तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपी हसिबा हिनं स्वतःच्याच प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी आणि मृतदेह लवकर कुजावा या उद्देशाने आरोपी महिलेने 24 तास बाथरूमचा नळ सुरू ठेवल्याचा संशय आहे. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने आणि घरमालकाला आरोपी महिलेचा व्हॉईस मेसेज आल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. या मेसेजमध्ये तिने प्रियकराचा खून करून मृतदेह बाथरूममध्ये एका गोणीत ठेवला असल्याचे सांगितले होते. हा मेसेज मिळताच घरमालकाने तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हत्येनंतर आरोपी महिला कोलकाता येथे फरार झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेच्या अटकेसाठी एक विशेष पथक कोलकात्याला रवाना झाले आहे. दरम्यान या थरारक हत्याकांडामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.