श्रावण म्हणजे सण आणि उत्सवांचा महिना. या महिन्यातील अनेक सण हे कृषीसंस्कृतीशी संबंधित असतात. असाच एक श्रावणातील शेतकऱ्यांचा लाडका सण म्हणजे बैलपोळा. हा सण श्रावण महिन्यातील आमवस्येला साजरा केला जातो. बैलांसाठी हा दिवस खास असतो. भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत या बैलाला अनन्यसाधारण महत्त्व असतं, त्यामुळे बैलांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
वर्षभर शेतात राबणाऱ्य़ा बैलाला या दिवशी आराम दिला जातो. बळीराजा आपल्या बैलाला आंघोळ घालतो. त्यांची शिंगं रंगवली जातात. त्यांचं संपूर्ण अंग रंगीत ठिपक्यांच्या नक्षीने सजवलं जातं. पायात चांदीचे तोडे, नाकात वेसण, गळ्यात घुंगरू, कपाळाला टिळा, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग बांधून बैलांना सजवण्यात येते. बैलांना नैवेदय म्हणून घरातील सुवासिनी पुरणपोळी तसंच गोडधोड खाऊ घालतात. वर्षभर बैलांची निगा राखणाऱ्या घरगड्यालाही नवीन वस्त्रं दिली जातात.
काळाच्या ओघात शेतीची कामे यांत्रिकीकरणाने होत आहे. असं असलं तरी बैलांना आजही पूर्वी इतकंच महत्त्व आहे. दिवसेंदिवस वाढत्या चारा तसंच पाणीटंचाईमुळे बैलजोडी सांभाळणं अवघड होत चाललं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खळ्यातील बैलजोड्या दिसेनाशा झाल्या आहेत. तरीही परंपरेनुसार बैलांची पूजा आजही केली जाते. आजकाल पोळा सणाला बैल नसले, तरी मातीच्या बैलांचं पूजन करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
यासाठी सणाच्या दोन महिने आधीपासून मातीचे बैल तयार करण्यास सुरुवात होते. येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बैलाच्या छोट्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचं काम केलं जातं. या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घरोघरी बैलांच्या पाच मूर्ती आणून त्यांचं पूजन केलं जातं. त्यांना नैवद्य दाखविला जातो. कृषीसंस्कृतीची ही नाळ शहरातही अशा पद्धतीने जोडून ठेवली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.