अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यात यावा यासाठी सोमवार २३ जानेवारी २०२३ रोजी नाशकात साधू – महंतांनी आंदोलन केले होते. यावर ‘सगळ्या भोंदूगिरीला संरक्षण मिळावं म्हणून आंदोलनकर्त्या साधू – महंतांकडून अशी मागणी करण्यात येत आहे’, असे अंनिसचे सह अध्यक्ष श्याम मानव ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
‘कोणत्याही धर्माच्या, देवाच्या किंवा लोकांच्या श्रद्धेच्या विरोधात हा कायदा नाही, तर फसवणुकीच्या, लुबाडणुकीच्या, करणी, जादूटोणा, भूत लावणे अशा अंधश्रद्धांविरोधात हा कायदा आहे, हे सर्वाना पटल्यानंतरच सर्वपक्षीय संमतीने हा कायदा बनवला गेला होता त्यामुळे कायदा रद्द करायचा असल्यास सर्वपक्षीय संमतीनेच कायदा रद्द करावा’, असे श्याम मानव यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना येणाऱ्या धमक्यांवर बोलताना, ‘मला धमक्या कायम येत असतात, मी अशा धमक्यांची पर्वा करत नाही’, असे श्याम मानव यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला सांगितले. तसेच, ‘सरकारने सुरक्षा पुरवली आहे’, असेही श्याम मानव यांनी यावेळी सांगितले.
‘केवळ हिंदू धर्मातल्या कुप्रथा दिसतात का ?’, असा सवाल कडवट हिंदू संघटनांनी श्याम मानव यांना केला आहे. यावर उत्तर देताना ‘माझ्या धर्मातील अंधश्रद्धा मला चांगल्या कळतात त्यामुळे मी या कुप्रथा बंद करत आहे आणि हेच करत असताना इतर धर्मियांतील भोंदू बाबांचेही पितळ उघडे पाडले आहे’, असे श्याम मानव यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सांगितले. ‘धीरेंद्र शास्त्री यांना विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध नाही’, अशी भूमिकाही श्याम मानव यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली.
बागेश्वर धाममधील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या ‘मी लोकांचे मन वाचू शकतो’, या दाव्यामुळे त्यांच्या दरबारात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. अशातच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सह अध्यक्ष श्याम मानव यांनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना थेट आव्हान दिले आहे. ‘चमत्कार करुन दाखवला तर ३० लाख रुपयांचे बक्षीस देऊ’, असे श्याम मानव म्हणाले आहेत.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.