IAS Tukaram Mundhe : खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची प्रचंड लूट! 11 रुपयांच्या सलाईनवर 325 रुपयांची MRP; तुकाराम मुंढेंच्या अहवालाने खळबळ

खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खिशावर कशा प्रकारे दरोडा टाकला जातो, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
IAS Tukaram Mundhe : खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची प्रचंड लूट! 11 रुपयांच्या सलाईनवर 325 रुपयांची MRP; तुकाराम मुंढेंच्या अहवालाने खळबळ

IAS Tukaram Mundhe FDA Report about Hospital Surgical Items MRP Scam: खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खिशावर कशा प्रकारे दरोडा टाकला जातो, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांनी केलेल्या व्यापक सर्वेक्षणात सर्जिकल साहित्य आणि वैद्यकीय उपकरणांवर तब्बल 2,841 टक्क्यांपर्यंत अवाजवी नफा वसूल केला जात असल्याचे उघड झाले आहे. एफडीएने रुग्णालयातील भरती रुग्णांसाठी (IPD) वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा ‘मार्केट सर्व्हे रिपोर्ट’ तयार केला होता. यामध्ये रुग्णालयांची मूळ खरेदी किंमत आणि रुग्णांना आकारली जाणारी कमाल छापील किंमत (MRP) यांची तुलना केली असता नफेखोरीचा हा प्रकार समोर आला.

आयएएस तुकाराम मुंढेंकडून धक्कादायक आकडेवारी जाहीर
ट्विटच्या माध्यमातून आणि अधिकृत अहवालाद्वारे तुकाराम मुंढे यांनी नफेखोरीची काही प्रत्यक्ष उदाहरणे देत खासगी रुग्णालयांच्या अपारदर्शक कारभारावर बोट ठेवले आहे:
– IV इन्फ्यूजन (सलाईन) सेट: रुग्णालयांना अवघ्या 11.05 रुपयांच्या ट्रेड प्राईसवर मिळणाऱ्या या सेटवर थेट 325 रुपयांची MRP छापली जाते; म्हणजेच त्यावर 2,841 टक्के इतका अफाट नफा कमवला जातो.
– कॅथेटर: हॉस्पिटल्सना एका पीससाठी 29.41 रुपये मोजावे लागतात, परंतु त्यावर 310 रुपयांची MRP छापून रुग्णांची लूट केली जाते.
– इतर रोजच्या वस्तू: सिरिंजेस, नेब्युलायझर, ऑक्सिजन मास्क आणि आयव्ही सेट्स यांसारख्या रोजच्या अत्यावश्यक साहित्यावरही असाच प्रचंड नफा उकळला जात आहे.

हतबल रुग्ण आणि नातेवाइकांचे आर्थिक शोषण
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकांना लावण्यात येणारे बिल योग्य आहे की नाही, हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नसतो, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. उत्पादक आणि वितरक यांच्या संगनमताने मूळ खरेदी किमतीपेक्षा अत्यंत जास्त MRP छापली जाते. उपचारादरम्यान रुग्णाचे नातेवाईक दरांची तुलना करू शकत नाहीत, इतर पर्याय शोधू शकत नाहीत किंवा बिलावर प्रश्नही विचारू शकत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांच्या किमतींमधील ही अपारदर्शकता आता थेट सार्वजनिक आरोग्याचा आणि रुग्णांच्या मूलभूत अधिकारांचा गंभीर प्रश्न बनली आहे.

हेही वाचा – Wardha Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यावर अखेर 7 दिवसांनंतर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांची प्रशासनाच्या विनंतीला सहमती

कायद्यातील त्रुटी आणि अनियंत्रित नफ्याचे कारण
देशात ‘ड्रग्ज (प्रायसेस कंट्रोल) ऑर्डर, 2013’ (DPCO) अंतर्गत केवळ अत्यावश्यक औषधांच्या दरांवर सरकारचे थेट नियंत्रण असते. मात्र, बहुतेक वैद्यकीय उपकरणे आणि सर्जिकल साहित्य (Medical Devices & Consumables) या कायदेशीर चौकटीच्या बाहेर ठेवण्यात आले आहेत. याच कायद्यातील त्रुटींचा आणि पळवाटांचा गैरफायदा घेऊन उत्पादक आणि खासगी रुग्णालये यांच्याकडून उपकरणांवर अनियंत्रित नफ्याची टक्केवारी लादली जाते, असे विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकार, NPPA कडे तातडीने ‘ट्रेड मार्जिन कॅपिंग’ची मागणी
या गंभीर प्रकाराची दखल घेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 10 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या औषध निर्माण विभाग (Department of Pharmaceuticals) आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीला (NPPA) थेट पत्र लिहिले आहे. वैद्यकीय साहित्याच्या मूळ खरेदी किमती आणि छापील MRP यातील ही तफावत थांबवण्यासाठी तातडीने कडक नियमावली आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या नफ्यावर मर्यादा आणण्यासाठी ‘ट्रेड मार्जिन कॅपिंग’ लागू करावे किंवा त्यांचे दर नियंत्रित करण्यासाठी विशेष मॉनिटरिंग फ्रेमवर्क तयार करावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे.

आरोग्य क्षेत्रातील अपारदर्शकता संपवण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
तुकाराम मुंढे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि एफडीएच्या अहवालामुळे खासगी आरोग्य क्षेत्रातील मोठ्या साखळीचे पितळ उघडे पडले आहे. सर्वसामान्यांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणि एनपीपीए (NPPA) यावर काय कायदेशीर पावले उचलते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एफडीएच्या या शिफारशी लागू झाल्यास वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Pune Firing : पुण्यात नक्की चाललंय काय? पुन्हा तरुणांकडून गोळीबार; पोलिसांकडून 6 जणांना अटक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version