राज्यातील प्रत्येक वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे आता अनिवार्य करण्यात आले असून, यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत नंबर प्लेट बसवून न घेतल्यास कोणताही अपवाद न करता संबंधित वाहनांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
सरनाईक यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये बनावट किंवा सहज बदलता येणाऱ्या साध्या नंबर प्लेटचा वापर झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना मदत व्हावी, या उद्देशाने HSRP प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
राज्यातील नव्या वाहनांना शोरूममधूनच HSRP नंबर प्लेट दिली जात असल्यामुळे त्यांच्यासाठी कोणतीही अडचण नाही. मात्र, जुन्या वाहनांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात HSRP बसविण्याचे काम बाकी आहे. आतापर्यंत सुमारे एक कोटी जुन्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या असून, हे प्रमाण एकूण पात्र वाहनांच्या केवळ 55 ते 56 टक्के आहे. त्यामुळे उर्वरित वाहनधारकांनी वेळ न दवडता ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
परिवहन मंत्री म्हणाले की, HSRP संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करताना कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही. मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिक या सर्वांना समान नियम लागू राहतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही इतर नागरिकांप्रमाणेच HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असेल. 31 डिसेंबरनंतर राज्यभर तपासणी मोहीम अधिक कठोर केली जाणार असून, HSRP नसलेल्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. संबंधित कारवाईत कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, "राज्यातील प्रत्येक वाहनावर HSRP नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. साध्या नंबर प्लेटमुळे गुन्हेगार वाहनांची ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळे निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन HSRP अनिवार्य करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्व वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवून घ्यावी. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही नियमांनुसार कारवाई केली जाईल."
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.