हिजाब प्रकरण : पुण्यात राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आंदोलन

हिजाब प्रकरण : पुण्यात राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आंदोलन

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. औरंगाबाद, मुंबई तर आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपविरोधात आंदोलन करण्यात आले. हिजाब बंदीविरोधात पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून कर्नाटकन सरकारचा निषेध करण्यात आला.

कर्नाटकमध्ये मुस्लिम भगिनींना हिजाब वापरण्यास बंदी केल्याने पुण्यातील भिडेवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. यावेळी काही महिला देशातील विविध वेशभूषेत पाहायला मिळाल्या. राज्यात हिजाब आणि बुरखाधारी महिलांचे समर्थन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी हिंदू धर्मीयांकडून भगवे वस्त्र परिधान करून रॅली काढण्यात आली.

हिजाबप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिजाबचा मुद्दा आपल्या राज्यात झालेला नाही, त्यामुळे इतर कोणत्याही राज्यातील प्रश्नांबाबत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणे योग्य नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अशांतता पसरवू नये, असे आम्ही पोलिसांना सांगितले असल्याचे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील एका महाविद्यालयामध्ये काही मुस्लिम धर्माच्या मुलींनी हिजाब घातल्याने त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारला होता. तसेच हिजाब घातलेल्या मुलींना वेगळ्या खोलीत बसण्यास सांगितले. ज्यावेळी या मुली महाविद्यालयाने ठरवलेल्या गणवेशात येतील तेव्हाच त्यांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच हिजाब घालण्याचा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version