गेल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर काल रात्री मुंबईमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे रात्री 12 ते 3 या दरम्यान साधारण काही ठिकाणी 100 मिलिमीटर च्या आसपास पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे जवळपास आठवड्याभराने पुन्हा एकदा मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केला आहे. असे असले तरी दोन दिवसात पाऊस नेमका किती पडतो यावर मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार का हे स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे. विदर्भ मराठवाड्यात ऊन आणि पाऊस असं मिश्र वातावरण राहील.
राज्यात 23 जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर दोन दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे तापमान घसरून उकाडा दूर झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारली. दररोज पावसाचे वातावरण तयार होते पण तसेच निघूनही जात आहे. पारा 35 अंशावर असून सरासरीपेक्षा 1.1 अंशाने अधिक असल्याने दमट वातावरणात उकाड्याचा त्रास वाढला आहे. अशातच मुंबईत मध्यरात्री पावसाची जोरदार हजेरी लावली आहे.
रात्री 12 ते 3 च्या दरम्यान सुरु झालेल्या जोरदार पावसाने चांगलचं झोडपून काढलं आहे. मागच्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात सरी बरसल्या आहेत. तर दक्षिण मुंबईच्या तुलनेत मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात जास्त पाऊस कोसळला आहे. यावेळी मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर नवी मुंबईसह ठाणे, पालघर, रागयड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊस राहील.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी विदर्भात भंडारा जिल्हा अद्याप कोरडाच आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस न आल्याने तापमानात वाढ झाली असून उकाडा वाढलेला आहे.जिल्ह्यात खरिपाची पेरणी व शेती मशागत पावसाअभावी खोळंबली आहे.
यावेळी बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या काही दिवसांनंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या पश्चिम किनारपट्टीसह अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.