महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

राज्याला पावसाने अक्षरक्ष: झोडपले आहे. मुंबईत तर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईवरील पावसाचा रेड अलर्ट आजही कायम असल्याने आज देखील ठाणे आणि मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. विदर्भात काही जिल्ह्यात पावसाने नागरिक वैतागले आहेत. दरम्यान, आज देखील राज्यावर मुसळधार पावसाचे सावट आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज तर विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. तर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आज सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर, काही भागात वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत आजही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुसळधार पावसामुळे रस्त्यांना पूर येणे, सखल भागात पाणी साचणे, नद्यांना पूर येणे, शहरी भागातील सबवे बंद होणे या सारख्या घटना होण्याची शक्यता आहे. तर मुसळधार पावसामुळे दृश्यमानतेत घट होऊन शहरी भागात पाऊस पडून जुन्या इमारती कोसळू शकतात. रस्ते खराब होऊ शकतात यामुळे वाहतूक संथ गतीने पुढे जाऊ शकते. तर घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात. पानलोट क्षेत्रात पूर येऊन पिकांचे नुकसान होऊ शकते. तर शहरी भागात वाहतूक कोंडी होऊ शकते यामुळे नागरिकांनी बाहेर पडण्याआधी आपल्या परिसरातील पावसाचा आणि वाहतुकीचा अंदाज घेऊन बाहेर पडावे असे आवाहन कारण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version