Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ, 5 तालुक्यांतील शाळांना सुट्टी

गेल्या 24 तासांच्या कालावधीत महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर या तिन्ही प्रमुख भागात मिळून तब्बल 975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ, 5 तालुक्यांतील शाळांना सुट्टी

Satara Rain Update: पश्चिम घाटातील डोंगराळ भागात सध्या पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. गेल्या 24 तासांच्या कालावधीत महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर या तिन्ही प्रमुख भागात मिळून तब्बल 975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये एकट्या महाबळेश्वरने 473 मिलीमीटर पावसासह उच्चांक गाठला आहे. या धुव्वाधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 75,000 ते 78,322 क्युसेक वेगाने पाणी जमा होत आहे. परिणामी, अवघ्या एका दिवसात धरणातील साठ्यामध्ये 6.76 टीएमसीची विक्रमी वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता धरणात 17.80 टीएमसी असलेला उपयुक्त साठा सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत थेट 22.54 टीएमसीवर पोहोचला आहे.

लिंगमळा धबधबा परिसर सील आणि वेण्णा तलाव ओव्हरफ्लो
धरण पाणलोट क्षेत्रासह पर्यटनस्थळांवरही या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. महाबळेश्वरमधील पर्जन्यवृष्टीमुळे प्रसिद्ध वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. तसेच, पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढल्याने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून पूर्णपणे बंद केला असून तेथे पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महाबळेश्वरव्यतिरिक्त कोयनानगर येथे 257 मिली मीटरआणि नवजा येथे 244 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोरणा, महिंद आणि ठोसेघर येथील जलस्रोतही ओसंडून वाहत आहेत.

हेही वाचा – Devendra Fadnavis : ‘आजचा दिवस गंभीर, दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार’; मुख्यमंत्र्यांनी दिला वर्क फ्रॉम होमचा सल्ला

5 तालुक्यांतील शाळांना सुट्टी आणि प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सोमवार, 6 जुलै रोजी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या 5 तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. कोयना आणि कृष्णा या मुख्य नद्यांसह पश्चिम भागातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version