शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गेल्यानंतर प्रथमच कोकणामध्ये उद्धव गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे, या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. रविवारी, ५ मार्च, २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता, रत्नागिरी, खेड येथील गोळीबार मैदानात ही जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत.
या सभेत खेड- दापोली मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा उद्धव गटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे प्रमुख विरोधक आहेत. संजय कदम यांनी उद्धव गटात प्रवेश केल्यास योगेश कदम यांच्या मतदारसंघात उद्धव गटाला बळ मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मराठी मुस्लिम महासंघाच्यावतीने देखील फतवा काढून संपूर्ण रत्नागिरीतील मुसलमानांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.