#MeToo मोहिमेचं वादळ आता ‘गुगल’ या मोठ्या कंपनीपर्यंत पोहोचले आहे, #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या 48 कर्मचाऱ्यांना गुगलने थेट घरचा रस्ता दाखवला आहे.
नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचई यांनी याबाबत एक पत्रकच जारी केले आहे.
अँड्रॉइडच्या निर्मितीत महत्त्वाचं योगदान असलेल्या अँडी रुबिन या वरिष्ठ कर्मचाऱ्याला लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर 9 कोटींचे एक्झिट पॅकेज देऊन नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते.
यावर गुगलकडे विचारणा करण्यात आली, त्यानंतर सुंदर पिचई यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ई-मेल धाडला. यामध्ये गेल्या 2 वर्षांत कंपनीतून 13 वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह एकूण 48 जणांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे आणि त्यातील कुणालाही एक्झिट पॅकेज देण्यात आलेलं नाही’, असं स्पष्ट केलं आहे.
‘गेल्या काही वर्षात आम्ही कंपनीत बदल केले आहेत. यामध्ये सहकारी कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तणुकीसंदर्भात कठोर कारवाईची तरतूद केली आहे.
कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे, तसेच, कोणत्याही अनुचित प्रकाराची कंपनीकडून तातडीतने दखल घेतली जाते. प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाते’, असंही पिचई यांनी म्हटंले आहे.
दरम्यान, रुबिन यांचे प्रवक्ते सॅम सिंगर यांनी रुबिन यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुबिन यांना नवी कंपनी स्थापन करायची आहे. त्यामुळेच त्यांनी गुगल सोडलं आहे, असं स्पष्टीकरण सॅम यांनी दिलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.