गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात अवघ्या 16 वर्षांच्या एका विधी संघर्ष बालकाने (अल्पवयीन मुलाने) दोन निष्पाप बालिकांना आपल्या वासनेचा बळी बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ पावले उचलत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलवायचा…
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका गावात हे संतापजनक कृत्य घडले. आरोपी 16 वर्षीय मुलगा हा पीडित बालिकांच्या घराशेजारीच राहतो. तो मागील काही दिवसांपासून दोन्ही बालिकांना खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलवत असे. या दोन पीडितांपैकी एक मुलगी आरोपीच्याच नात्यातील आहे. घरात कोणी नसताना किंवा संधी साधून तो या दोन्ही मुलींसोबत अश्लील चाळे करायचा.
बदनामीच्या भीतीने सुरुवातीला मौन, पण…
नात्यातीलच मुलगा असल्याने आणि कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पीडित मुलीच्या कुटुंबाने सुरुवातीला या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. कौटुंबिक पातळीवर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, मात्र आरोपीची हिंमत दिवसेंदिवस वाढतच गेली. जेव्हा त्याने शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या बालिकेवरही अत्याचार केला, तेव्हा हा संपूर्ण काळाबाजार चव्हाट्यावर आला. दुसऱ्या पीडित बालिकेच्या आईला हा प्रकार समजताच त्यांनी जराही वेळ न घालवता थेट पोलिसांचे दार ठोठावले.
पोलिसांची तात्काळ आणि कठोर कारवाई
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तक्रार मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून वेगाने चक्रे फिरवली. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम अल्पवयीन मुलाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
'पॉक्सो'सह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64(2) (आय), 64(2) (एम), 65(2), 351(3) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा 2012 (पॉक्सो – POCSO) च्या कलम 4, 6 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.