अक्षय्य तृतीयेला सर्वाधिक सोने खरेदी कोणत्या भागात होते? जाणून घ्या सविस्तर

मागील वर्षी अक्षय्य तृतीयेला 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 73,240 रुपये होता, तर यंदा तो तब्बल 95,900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात सोन्याच्या दरात जवळपास 30 टक्के उडी झाली आहे.
अक्षय्य तृतीयेला सर्वाधिक सोने खरेदी कोणत्या भागात होते? जाणून घ्या सविस्तर

मुंबई: जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता आणि अनेक देशांच्या केंद्रीय बँकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या सोन्याच्या साठ्यामुळे या मौल्यवान धातूच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षी अक्षय्य तृतीयेला 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 73,240 रुपये होता, तर यंदा तो तब्बल 95,900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात सोन्याच्या दरात जवळपास 30 टक्के उडी झाली आहे.

गेल्या सहा वर्षांचा विचार करता, 2019 मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 31,729 रुपये होती. त्यानंतर सातत्याने वाढ होत 2020 मध्ये 46,527 रुपये, 2021 मध्ये 47,676 रुपये, 2022 मध्ये 50,808 रुपये, 2023 मध्ये 59,845 रुपये आणि 2024 मध्ये 73,240 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तब्बल 200 टक्क्यांचा परतावा मिळाल्याचे दिसून येते. 

सोन्याच्या खरेदीमध्ये प्रादेशिक पातळीवर लक्षात येण्याजोगा बदल दिसतो. एका अहवालानुसार, यंदा अक्षय्य तृतीयेदिवशी सर्वाधिक खरेदी दक्षिण भारतात झाली असून ती एकूण खरेदीच्या सुमारे 40% इतकी होती. त्यानंतर पश्चिम भारतात 25%, पूर्वेकडील भागात 20% आणि उत्तर भारतात 10% खरेदी नोंदली गेली. विशेष म्हणजे, उत्तर भारतात सोने खरेदीसाठी धनत्रयोदशी अधिक महत्त्वाची मानली जाते.

उच्च दरांमुळे ग्राहकांच्या पसंतीतही परिवर्तन झाले असून पारंपरिक 22 आणि 24 कॅरेट ऐवजी हलक्या वजनाचे 14 आणि 18 कॅरेटचे दागिने सध्या अधिक मागणीत आहेत. ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार सराफ व्यावसायिकांनीही नवे पर्याय तयार केले आहेत. काही लोक पारंपरिक भेटवस्तू म्हणून सोनं न देता थेट रोख रक्कम किंवा डिजिटल गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहेत.

29 एप्रिल संध्याकाळी सुरू होणारा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त 30 एप्रिलच्या दुपारी संपेल. या शुभ दिवशी नवीन खरेदी, घरगुती गुंतवणूक व आर्थिक सुरुवातीसाठी मोठा शुभ काळ मानला जातो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख ते 1.04 लाख रुपयांच्या दरम्यान राहू शकतो. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version