बीड येथे एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर 4 जणांनी बलात्कार केल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपींनी पीडितेला पुणे आणि गडचिरोली येथे नेऊन अत्याचार केला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी 2 आरोपींना पकडण्यात आलं आहे. उर्वरीत 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेकनूर पोलिसांनी दिलेली माहितीवरुन, नातेवाईकांनी मुलीची सुटका केली. पीडित विद्यार्थिनी 29 जुलैला शेतात जात होती. त्यावेळी अक्षय डोईफोडे (वय 20), अच्युत मुंडे (वय 20), गणेश डोइफोडे, राज डोइफोडे या चौघांनी या मुलीला वाहनातून पळवून नेलं. अंबाजोगाईहून त्यांनी थेट पुणे गाठलं आणि तेथून ते गडचिरोलीला पोहोचले. तेथे महिनाभर अक्षय डोईफोडे आणि अशोक मुंडे या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी नेकनूर ठाणे गाठून ती हरवल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, ती आढळली नाही. अखेर नजर चुकवून पीडित विद्यार्थीनीने 2 दिवसांपूर्वी घडलेला प्रकार घरी फोनवरुन सांगितला. त्यानंतर गडचिरोलीतील पत्ताही कळविला. त्यानंतर नातेवाईकांनी गडचिरोलीत जाऊन पीडित मुलीची सुटका करत दोघांना ताब्यात घेतले. इतर दोघे फरार झाले. मुलीसह २ तरुणांना घेऊन नातेवाईक रविवारी दुपारी नेकनूर ठाण्यात पोहोचले. पीडितेच्या तक्रारीवरुन अपहरण, बलात्कार या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उर्वरित 2 आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांनी दिली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आरोपींची आणि पीडितेची ओळख झाली होती. त्यानुसार त्यांनी पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती प्रतिसाद देत नसल्याने आरोपींनी तिचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.