गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंशाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. रात्री झोपलेल्या विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्यानंतर तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत तब्बल 12 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी रात्री जेवण केल्यानंतर झोप घेतली होती. मध्यरात्री साधारण दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्याचे समोर आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. धानोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल यांचा मृत्यू झाला.
इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिलाही गंभीर अवस्थेत गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे या घटनेतील मृत विद्यार्थिनींची संख्या तीन झाली आहे. दरम्यान, सर्पदंशामुळे जखमी झालेल्या तब्बल 12 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, इयत्ता सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम यांच्यासह इतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी नैताम हिची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.