गडचिरोली येथील पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तत्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. सिरोंचा येथे मेडीगट्टा बॅरेजेसचे सगळे उघडलेले ८५ दरवाजे कमी न करण्याबाबत त्याचप्रमाणे श्रीपाद एलमपल्ली प्रकल्पाचे दरवाजे कमी न करण्याबाबत तेलंगणा सरकारला विनंती करावी तसेच गोसीखुर्द विसर्गाचे योग्य नियोजन झाले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांचे योग्य पद्धतीने स्थलांतर व्हावे तसेच त्यांना जेवण, पिण्याचे चांगले पाणी मिळावे तसेच त्यांच्यावर आवश्यकतेनुसार व्यवस्थित उपचार व्हावेत असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला तसेच मदत पुनर्वसन विभागाला दिले
गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती ३० वर्षानंतर पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुके रेडलाईट करण्यात आलेले आहेत. जवळपास ५० गावात पुराचे पाणी शिरले. तीन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. जिल्ह्यातील वैनगंगा , प्राणहिता, गोदावरी इंद्रावती हे चार नद्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सध्या जिल्ह्यातील चार राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद पडलेले आहेत. आलापल्ली, आष्टी, चंद्रपूर, राष्ट्रीय महामार्गावर वैनगंगा नदीला पूर आला. चार फूट पाणी राष्ट्रीय महामार्गावरून वाहत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसाचा फटका अनेक नदी-नाल्यांना व तलावांना बसलेला आहे. सातव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. परंतु पूर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात कायम आहे. गडचिरोलीला लागून असलेल्या तलावाला पूर आल्यामुळे पुराचे पाणी महाविद्यालय क्रीडांगणात शिरलेआहे.या पुरामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडणे अवघड होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.