मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: मुंबईत लेप्टोचा यावर्षीचा पहिला बळी गेला आहे. पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये ११ जूनला लेप्टोची लक्षणे असलेल्या एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते. मात्र १४ जूनला त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू लेप्टोने झाल्याचे अखेर वैद्यकीय अहवाला स्पष्ट झाले आहे. यंदा पाऊस सुरू होण्यापूर्वी लेप्टोचे रुग्ण आढळून येत असून, गेल्या वर्षीच्या जून महिन्यात केवळ १२ रुग्ण नोंदले होते. मात्र, या जून महिन्यात लेप्टोच्या ९७ रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ लेप्टोच नाही तर डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, हिपॅटायटीस ए आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रिपोर्टिंग युनिटमध्ये वाढ झाल्याने अधिक रुग्णांची नोंद होत असून, त्यामुळे या आकडेवारीत वाढ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, याआधी वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात होती, परंतु आता एचबीटी क्लिनिक, आरोग्य पोस्ट आणि खाजगी निदान केंद्रे देखील अहवाल देत आहेत. त्यामुळे प्रकरणे नोंदवली जात आहेत.
मुंबईत १ जानेवारीपासून ३० जूनपर्यंत लेप्टोचे ४३२रुग्ण सापडले होते. तर जून महिन्यात ९७ रुग्णांची नोंद झाली. २०२२ मध्ये लेप्टोने ५ जणांचा बळी गेला होता. तर २०१९ मध्ये तब्बल ११ जण दगावले होते. यंदा लेष्टोचा पहिला बळी गेला आहे. नायर होस्पिटलमध्ये १४ जूनला मृत्यू झालेल्या रुग्णांचा वैद्यकीय अहवाल हॉस्पिटलला प्राप्त झाला असून यात लेफ्टोने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी लेप्टोमुळे एका मृत्यूची नोंद झाली असल्याचे एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले, यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच लेप्टोच्या आकडेवारीने गेल्या वर्षीच्या आकडेवारीला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी लेप्टोचे २८६ रुग्ण होते, तर या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत ४३२ रुग्ण आढळले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.