जय महाराष्ट्र न्यूज, करमाळा
मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून करमाळा तालुक्यातील वीट येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने कंटाळून बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरू असताना करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. धनाजी चंद्रकांत जाधव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
वीट येथील जांभूळझरा येथील वस्तीवर राहणारे धनाजी चंद्रकांत जाधव यांच्यावर सावकार व बँकेचे कर्ज होते. धनाजी यांनी शेतकरी संपात व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्याच्या खिशातून चिठ्ठी निघाली असून त्या चिठ्ठीत जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत मला जाळायचं नाही असे स्पष्टपणे लिहिलं.
कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना वीटमध्ये धनाजी चंद्रकांत जाधव याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.