दिल्ली: दिग्दर्शिका फराह खान म्हणजे बॉलीवूडमधील एक धडाकेबाज नाव. पण सध्या फराह चित्रपटांमुळे नाही, तर तिच्या युट्यूब व्लॉग्समुळे (YouTube Vlogs) इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या किचनमध्ये शिरकाव केल्यानंतर, आता फराहने थेट दिल्ली गाठली आहे. निमित्त होतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शासकीय निवासस्थानाला भेट देण्याचं. फराहसोबत तिचा लाडका आचारी ‘दिलीप’ देखील होता, ज्याने आपल्या चटपटीत स्वभावाने आता गडकरींनाही भुरळ घातली आहे.
सेलिब्रिटी आचारी दिलीपची गडकरींकडे ‘खास’ मागणी!
गेल्या दीड वर्षात फराह खानच्या चॅनेलवर जितकी फॅन फॉलोइंग फराहची आहे, तितकीच तिचा आचारी दिलीपचीही वाढली आहे. मनीष मल्होत्रा ते मलायका अरोरापर्यंत सर्वांच्या घरी जेवण बनवणारा दिलीप आता थेट गडकरींच्या स्वयंपाकघरात पोहोचला. गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी दिलीप आणि फराहने मिळून अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीचे खमंग वडे तयार केले. विशेष म्हणजे, वडे बनवताना दिलीप संधी सोडेना; त्याने गडकरींकडे चक्क आपल्या गावचा रस्ता बनवून देण्याची हक्काने मागणी केली, ज्यामुळे तिथे एकच हशा पिकला.
135 किलो वरून थेट 89! गडकरींचा फिटनेस फंडा
या भेटीदरम्यान नितीन गडकरींनी आपल्या फिटनेस प्रवासाचे काही थक्क करणारे खुलासे केले. कधीकाळी 135 किलो वजन असलेल्या गडकरींनी कडक शिस्त आणि व्यायामाच्या जोरावर आपले वजन आता 89 किलो पर्यंत कमी केले आहे. रोज रात्री 9.30 ला झोपणे आणि सकाळी 7 वाजता न चुकता व्यायाम करणे, हे त्यांच्या आरोग्याचे रहस्य ऐकून फराह खानही थक्क झाली. गडकरींच्या पत्नीची उपस्थिती आणि त्यांच्या घराचा साधेपणा या व्लॉगमध्ये प्रेक्षकांना जवळून अनुभवता येणार आहे.
“मी महामार्ग बनवतो, गल्लीतले रस्ते नाही!”
दिलीप आणि गडकरींमधील संवाद हा या व्लॉगचा सर्वात मजेशीर भाग ठरला. “तुझं गाव कोणतं?” असं गडकरींनी विचारल्यावर दिलीपने बिहारचं नाव सांगितलं. त्यावर गडकरी मिश्किलपणे म्हणाले की, “मी बिहारमध्ये खूप रस्ते बनवले आहेत.” पण जेव्हा दिलीपने त्याच्या गावातील एका छोट्या रस्त्याबद्दल तक्रार केली, तेव्हा गडकरींनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं, “मी मोठे हायवे (National Highways) बनवतो, छोटे गल्लीतले रस्ते नाही!” त्यांच्या या उत्तराने फराह आणि दिलीप दोघेही गडकरींच्या कामाच्या आवाक्याने थक्क झाले.
दिलीपची ‘क्रेझ’ बॉलीवूडपेक्षा कमी नाही!
आज परिस्थिती अशी आहे की फराह खान कुठेही गेली की चाहते आधी “दिलीप कुठे आहे?” असं विचारतात. साध्या आचाऱ्यापासून सुरू झालेला दिलीपचा प्रवास आता जाहिरातींपर्यंत पोहोचला आहे. अनन्या पांडे असो वा जॅकी श्रॉफ, प्रत्येक सेलिब्रिटीला दिलीपच्या हातची चव आणि त्याची फराहसोबतच्या गप्पा आवडतात . नितीन गडकरींसारख्या दिग्गज नेत्याच्या घरी जाऊन स्वयंपाक करणे आणि त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणे, हे या व्लॉगचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे.
लवकरच येणार संपूर्ण व्लॉग
नितीन गडकरींच्या घराची आणि त्यांच्या स्वयंपाकघराची ही खास झलक सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाली आहे. अद्याप या भेटीचा पूर्ण व्लॉग येणे बाकी असून, चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकारण आणि बॉलीवूडचा हा अनोखा ‘तडका’ प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळं आणि मनोरंजक पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा: तिरंगी लढत, आयाराम-गयारामांची डोकेदुखी आणि बंडखोरी; सोलापूर मनपातील कोणते मुद्दे चर्चेत?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.