नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात विवाहाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. बोगस वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली ही टोळी कार्यरत असून, अनेक तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने विवाह इच्छुक तरुणांना योग्य वधू मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. विश्वास संपादन केल्यानंतर लग्न जमवण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात होती. सर्व काही व्यवस्थित असल्याचा भास निर्माण करून लग्नही लावून दिले जात होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच संबंधित नवरी वेगवेगळ्या कारणांनी माहेरी जाण्याचा बहाणा करत घर सोडत असे आणि पुन्हा परत येत नव्हती.
या प्रकारामुळे अनेक तरुण आर्थिक तसेच मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये तर नवरी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी गायब झाल्याचेही समोर आले आहे. या फसवणुकीमुळे येवला शहर आणि तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर येवला शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पारेगाव रोड परिसरातील एका संशयित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात टोळीतील काही सदस्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. प्राथमिक तपासात पारेगाव आणि सुरेगाव येथील काही तरुणांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.