Private Travels:दिवाळी म्हटलं की महाराष्ट्रात सुट्यांचा काळ, गावाकडे जाण्याची लगबग आणि नातेवाईकांना भेटण्याची धावपळ सुरू होते. मात्र या आनंदाच्या क्षणी प्रवाशांच्या खिशाला मोठा ताण बसणार आहे. खासगी बस ऑपरेटरांनी भाड्यांमध्ये केलेल्या प्रचंड वाढीमुळे प्रवास महागडा होणार असून, ऐन दिवाळीत नागरिकांचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील प्रमुख शहरांतून मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर यांसारख्या ठिकाणी जाणाऱ्या खासगी बससेवांच्या भाड्यात दुप्पट ते तिप्पट वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. साधारण 600 ते 800 रुपयांत होणारा प्रवास आता दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत महागला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना तर चार हजार रुपयांहून अधिक मोजावे लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ऑनलाईन बुकिंगचे धक्कादायक दर
तिकीट बुकिंगसाठी ऑनलाईन अॅप्स किंवा वेबसाइट्सवर नजर टाकली असता दिवाळीच्या काळात भाड्यात थेट तिप्पट वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसते. उदाहरणार्थ, पुणे मार्गावरील प्रवास साधारण 550-600 रुपयांत होत असतो. मात्र सणासुदीच्या दिवसांत हाच दर 1500 रुपयांच्या घरात पोहोचत आहे. मुंबईच्या मार्गावरील तिकिटे 800 रुपयांवरून 2500 रुपयांवर गेल्याने प्रवाशांमध्ये संताप पसरला आहे.
नियम काय सांगतात?
नियमाप्रमाणे खासगी बस ऑपरेटरांना एसटीच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याची परवानगी आहे. पण प्रत्यक्षात सणासुदीच्या काळात हा नियम धाब्यावर बसवला जातो आणि प्रवाशांच्या खिशावर अन्यायकारक भार टाकला जातो. प्रवाशांना अशा प्रकारे फसवले जात असल्यास तक्रार करण्याचा अधिकार आहे, मात्र बहुतांश वेळा लोक टाळाटाळ करतात आणि महागडे भाडे देऊन प्रवास करतात.
प्रवाशांचा आक्रोश
नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. रेल्वेची तिकिटे मिळत नाहीत, एसटीची बससेवा अपुरी पडते. परिणामी खासगी बस हीच एकमेव सोय राहते. याचा गैरफायदा घेत अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या मनमानी दर आकारत आहेत. विद्यार्थी, कामगार वर्ग आणि कुटुंबांसाठी हे अतिशय जड जात आहे.
सरकार आणि प्रशासनाची भूमिका
दरवर्षी दिवाळीत असे प्रकार घडतात. आरटीओकडून अधूनमधून कारवाई जाहीर केली जाते, पण प्रत्यक्षात प्रवाशांना दिलासा मिळत नाही. लोकांच्या तक्रारींवरून जर ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर दरवाढ थांबणार नाही. यासाठी तक्रार नोंदवणे, ऑनलाईन हेल्पलाईन्स वापरणे आणि प्रशासनाने कठोर नियम लागू करणे गरजेचे आहे.
सणासुदीच्या दिवसांत महागाईचा फटका सर्वांनाच बसतो, पण प्रवास ही लोकांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी थांबवून प्रवाशांना न्याय मिळणे आवश्यक आहे. दिवाळीचा उत्साह महागड्या प्रवासामुळे ओसरू नये, हीच जनतेची अपेक्षा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.