जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
खगोलप्रेमींबरोबरच सर्वांसाठी चंद्रदर्शनाचा आज तिहेरी योग जुळून आलाय. बुधवारी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लूमून यांचे साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार आहे. ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्या वेळी त्याला सुपरमून म्हणतात. बुधवारी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष 59 हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे.
चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे. या वेळी 2 जानेवारी आणि 31 जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्याने 31 जानेवारीच्या चंद्रास ब्लूमून म्हटलेले आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल.
सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि सुपर-ब्लू-ब्लडमूनचे दर्शन होईल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी होईल आणि रात्री 8 वाजून 42 मिनिटांनी ग्रहण सुटेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.