राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळतात. अशातच जयंत पाटील यांची काल तब्बल साडेनऊ तास ईडी चौकशी झाली. ईडीने समन्स बजावल्यापासून चौकशी होईपर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी फोन केल्याची माहिती जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र यासोबतच अजित पवारांचा मला फोन आला नसल्याचेही ते म्हणाले होते. यावरून पुन्हा एकदा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. परंतु याप्रकरणावरील मौन अजित पवारांनी सोडले असून जयंत पाटलांच्या चौकशीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
जयंत पाटलांच्या ईडी चौकशीनंतर अजित पवारांनी फोन केला नसल्याची माहिती जयंत पाटलांनी स्वतः दिली. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणा असतात. वेगवगेळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार या यंत्रणांना आहे. या यंत्रणांनी चौकशीला बोलावल्यानंतर नेतेमंडळी पूर्णपणे सहकार्य करतात. जयंत पाटलांना साडेनऊला सोडल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट आपण ऐकले आहे. आता याबद्दल दबक्या आवाजात भूमिका घेतात.
मुंबईच्या अधिवेशनात वरच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काय सांगितले हे रेकॉर्डमध्ये आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मंत्री राहिलेले मंत्री भाजपमध्ये गेले. त्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की इकडे आलो. आता काही त्रास नाही, व्यवस्थित झोप येते आम्ही बिंधास्त आहोत. तीच गोष्ट सांगली जिल्ह्यात खासदारांनी सांगितली. केंद्रीय राज्यमंत्र्यांनीही स्टेटमेंट केले की आम्ही स्वच्छ करतो, निरमा पावडर घालतो वगैरे. वास्तविक एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून अशी स्टेटमेंट येतात. चौकशीला बोलावल्यानंतर काही घाबरण्याचे कारण नाही. काहींनी पूर्वीची उदाहरणे दिली की युपीए सरकार असताना मोदी आणि शहा यांनाही कसे बोलावले होते वगैरे. परंतु, द्वेष भावनेतून, राजकीय सुडबुद्धीने कोणाला बोलावण्यात येऊ नये. काही क्लू मिळाला, तर नोटीस काढण्याचा त्यांचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.