प्रतिनिधी किशोर पगारे, डोंबिवली: यंदा डोंबिवलीकर परिवारातर्फे साजरी होणारी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा विशेष ठरणार आहे. यंदाचे वर्ष भारताच्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याचे आहे. तसेच, याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आशयघन चित्ररथ डोंबिवलीत उभारले जाणार असून ते लक्षवेधी ठरतील, अशी अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. ‘वंदे मातरम्’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या आणि रा. स्व. संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथ संकल्पनेला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराचे प्रवर्तक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
यंदाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे दीडशे फूट उंचीची गुढी असणार आहे. विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभी राहील, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी, हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत व्हावे या उद्देशाने डोंबिवलीतून नववर्ष शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेला आता जगभरातील मराठी आणि हिंदू समुदायानेही आपलेसे केले आहे. डोंबिवलीतील या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ या संस्थेमार्फत राबवले जाणारे विविध अनोखे उपक्रम.
यंदा देशभक्तीची विविध रूपे सादर करण्याच्या उद्देशाने ‘क्रांतिकारी देशसेवक’ या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 5 वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून स्वराज्य, स्वातंत्र्य आणि देशासाठी त्याग करणाऱ्या व्यक्तींची वेशभूषा साकारणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येईल. विजेत्यास 25,000 रुपयांचे बक्षीस, तर उपविजेत्यास 15,000 रुपये आणि इतर आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.