Doctors Strike Update: संप मागे, पण लढा कायम! 9 ऑगस्टपासून IMA चा मुंबईत आंदोलनाचा इशारा

राज्यभरातील वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून रुग्णांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Doctors Strike Update: संप मागे, पण लढा कायम! 9 ऑगस्टपासून IMA चा मुंबईत आंदोलनाचा इशारा

डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ 'इंडियन मेडिकल असोसिएशन' (IMA)ने जाहीर केलेला राज्यव्यापी संप अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन रद्द केल्यानंतर IMA ने आपली भूमिका बदलली. त्यामुळे राज्यभरातील वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून रुग्णांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर बदलली भूमिका

डोंबिवलीतील मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना यापूर्वी मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. या निर्णयानंतर IMA च्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई योग्य दिशेने सुरू असल्याचे लक्षात घेऊन सध्या राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आरोग्य सेवा पूर्ववत

संपामुळे राज्यातील बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि नियमित वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, संप मागे घेतल्यामुळे सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील नियमित आरोग्य सेवा सुरळीत सुरू राहणार असून रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

इतर मागण्यांवर IMA ठाम

संप मागे घेतला असला तरी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतच्या मागण्या कायम असल्याचे IMA ने स्पष्ट केले आहे. या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

 9 ऑगस्टपासून आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा

IMA च्या बैठकीत 9 ऑगस्ट 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना आणि इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संघटनेने जाहीर केली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version