Dharashiv ZP Education Drive: भोंगा वाजणार आणि टीव्ही-मोबाईल बंद होणार; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवीन ‘पॅटर्न’, नेमकं प्रकरण काय?

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी होऊन अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Dharashiv ZP Education Drive: भोंगा वाजणार आणि टीव्ही-मोबाईल बंद होणार; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवीन ‘पॅटर्न’, नेमकं प्रकरण काय?

धाराशिव: संध्याकाळ झाली की घराघरातून मालिकांचे आवाज आणि मुलांच्या हातात मोबाईल स्क्रीन'… हे चित्र आजकाल प्रत्येक गावात आणि शहरात अगदीच ओळखीचे झाले आहे. वाढत्या 'स्क्रीन टाईम'च्या आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या नव्या पिढीचे भवितव्य कुठे चालले आहे, हा प्रश्न सध्या सर्वांनाच सतावतोय. मात्र, या गंभीर समस्येवर धाराशिव जिल्हा परिषदेने एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. 'सोशल मीडियाच्या मायाजालातून' तरुणाईला बाहेर काढण्यासाठी धाराशिवमध्ये आता 'टीव्ही बंद, अभ्यास सुरू' असा नवा आणि प्रगल्भ मंत्र घुमणार आहे.

विद्यार्थ्यांच्या हातातून मोबाईल काढून त्यांना पुन्हा पुस्तकांच्या जगात रमवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या निर्णयानुसार, जिल्ह्यातील प्रत्येक गावात दररोज रात्री सात ते नऊ ही वेळ केवळ आणि केवळ 'अभ्यास वेळ' म्हणून राखीव ठेवण्यात आली आहे. या दोन तासांत कोणत्याही घरात टीव्ही चालणार नाही किंवा मुलांच्या हातात मोबाईल दिसणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे.

'निर्णय केवळ कागदावर आणि अंमलबजावणी शून्य' अशी सरकारी कामांची नेहमीची ख्याती असते, पण या योजनेचे खरे वैशिष्ट्य म्हणजे तिचे 'ग्राऊंड लेव्हल'वरील नियोजन! दररोज रात्री बरोबर सात वाजता गावातील ग्रामपंचायतींवर किंवा मंदिरांवर बसवलेले भोंगे वाजतील.

हेही वाचा: Satara Zilla Parishad Election: साताऱ्यात पुन्हा राजकीय रणकंदन! काळ्या फिती अन् जोरदार घोषणाबाजी; भाजपविरुद्ध विरोधक एकवटले

हा भोंगा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला बसण्याची आणि पालकांसाठी टीव्ही बंद करण्याची 'अलार्म बेल' असेल. एवढ्यावरच न थांबता, गावात शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक या दोन तासांत गावात गस्त घालेल. घरोघरी जाऊन खरोखरच टीव्ही बंद आहेत का आणि मुले अभ्यासात मग्न आहेत का, याची प्रत्यक्ष खातरजमा हे पथक करणार आहे.

केवळ निर्बंध लादून प्रश्न सुटत नाहीत, तर त्यासाठी पूरक आणि पोषक वातावरणही द्यावे लागते, याची जाणीव प्रशासनाला आहे. म्हणूनच, मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्यासाठी शाळा सुटल्यानंतरही शिक्षकांची मदत उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ शालेय परीक्षाच नव्हे, तर आगामी स्पर्धा परीक्षांमध्येही यशाचे झेंडे रोवावेत, हा या व्यापक मोहिमेचा मुख्य केंद्रबिंदू आहे.

"मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनीही केवळ दोन तास मनोरंजनाचा म्हणजेच टीव्हीचा त्याग करून प्रशासनाला सहकार्य करावे," असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले आहे. शैक्षणिक वर्तुळातून आणि सुजाण नागरिकांकडून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. मात्र, 'घरातील टीव्ही बंद करण्याच्या सक्तीवर' सर्वसामान्य गावकरी खरोखरच कसा प्रतिसाद देतील आणि या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती यशस्वी होईल, हे पाहणे गरजेचे आहे. तरीही, उद्याचा साक्षर समाज घडवण्यासाठी धाराशिवने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. 

हेही वाचा: Nanded Crime : मारायला आले आणि जीवानीशी गेले! दोघांना रस्त्यात तर एकाला रुग्णालयात जाऊन संपवलं, गॅंगवॉरने शहर हादरलं

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version