मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये २० दिवसांपूर्वी ननावरे दाम्पत्याने काही गुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने एक व्हिडीओ शूट केला होता. जो आता व्हायरल झाला आहे. त्यात त्याने साताऱ्यातील काही लोकांची आणि वकिलांची नावे घेऊन हे सर्व लोक त्याचा मानसिक छळ करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ननावरे दाम्पत्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. या घटनेला आज वीस दिवसांहून अधिक दिवस झाले तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. याच्या निषेधार्थ ननावरे यांच्या भावाने चक्क स्वत:च्या डाव्या हाताचं एक बोटच थेट मुळापासून कापून टाकलं.
ननावरे यांच्या भावाने एक व्हिडीओ शूट केला असून त्यात त्यांनी तोडलेलं बोट दाखवलं आहे. स्वत:चं तोडलेले बोट घेऊन ते थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले. जिथे त्यांनी टेबलावरच आपलं बोट फेकलं. ज्यामुळे एकच खळबळ माजली. आपलं हे बोट आपण राज्य सरकारला पाठवत आहोत. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शरीराचा एक-एक भाग कापून घेणार असल्याचं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील अशेलेपाडा परिसरात नंदकुमार ननावरे हे कुटुंबासह राहत होते. सुमारे २० दिवसांपूर्वी ननावरे यांनी पत्नीसह बंगल्याच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ननावरे यांच्या पत्नीचे नाव उर्मिला आहे. आत्महत्येनंतर काही दिवसांनी, एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये ननावरे यांनी सांगितले की, काही गुंड त्याला त्रास देत होते, म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत. नंदकुमार ननावरे हे यापूर्वी माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर गेली काही महिने ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र या घटनेनंतर डॉ. ननावरे हे आपले स्वीय सहाय्यक नसल्याचे बालाजी किणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.