भूतान : काल दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये झाला. स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांना आग लागली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस आणि तपास यंत्रणा सध्या सर्व शक्यता तपासत असून दहशतवादी कटाचा संशय व्यक्त केला जात आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.
सध्या भूतान दौऱ्यावर असलेले मोदी म्हणाले, “आज मी इथे अत्यंत जड मनाने आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेने प्रत्येक भारतीयाच्या मनाला वेदना झाल्या आहेत. मी पीडित कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे आणि त्यांना माझी सहवेदना व्यक्त करतो.” पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “मी काल रात्रीपासून सतत सर्व तपास यंत्रणांशी संपर्कात होतो. एजन्सींनी दिलेल्या प्रत्येक माहितीकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवत आहोत. विचारविनिमय सुरू आहे आणि सर्व संबंधित अधिकारी एकत्रितपणे या कटाचा उलगडा करण्यासाठी काम करत आहेत.”
हेही वाचा: Delhi Car Blast: कट उघड झाल्याने केला आत्मघातकी हल्ला; फरिदाबाद मॉड्यूलबाबत मोठा खुलासा
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या धक्कादायक कटामागे कोण आहे, हे उघड केले जाईलच आणि दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. जे लोक या हल्ल्याच्या मागे आहेत, त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल. देशाच्या सुरक्षेवर कुणाच्याही हाताने घाव बसू दिला जाणार नाही.” काल घटनेनंतर मोदींनी सोशल मीडियावरूनही आपली प्रतिक्रिया दिली.
त्यांनी एक्सवर लिहिलेले, “दिल्लीतील स्फोटात ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी नागरिकांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी प्रार्थना आहे.” भूतानमधील त्यांच्या भाषणादरम्यान मोदी म्हणाले की, “काल झालेल्या घटनेने माझं मन विषण्ण झालं आहे. पण मला आपल्या तपास संस्थांवर आणि सुरक्षादलांवर पूर्ण विश्वास आहे. त्या लवकरच या स्फोटामागील संपूर्ण साखळी उघड करतील.”
पंतप्रधानांनी देशवासियांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले तसेच प्रशासनाला शक्य तितक्या लवकर सत्य समोर आणण्याचे निर्देश दिले आहेत. मोदींच्या या वक्तव्यानंतर केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक बोलावून सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण देशात सतर्कतेचा आदेश दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.