टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे सापडले आहेत. महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले होते. याबाबतची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पुणे पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेस यश आले. महादेव जाधव यांना मुंढवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पुण्यातील कोथरूड भागातून सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाल्याची माहिती होती. केदार जाधवचे वडील महादेव जाधव यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांच्याशी कुठला ही संपर्क होऊ शकलेला नव्हता. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून शोध पथके रवाना करण्यात आली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासण्यात आले.
वारजे, कोथरूड, सिंहगड रोड, उत्तम नगर या पोलीस ठाण्यांना महादेव जाधव हे बेपत्ता झाल्याची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर या पोलीस ठाण्याचे कर्मचारीदेखील महादेव जाधव यांचा शोध घेत होते.महादेव जाधव हे कोथरूड येथील निवासस्थानातून बाहेर पडल्यावर ते बॅरोमीटर हॉटेल पासून पुढे साने डेअरी, कोथरूड स्टँड आणि त्यानंतर कर्वे पुतळा या ठिकाणी त्यांचे शेवटचे लोकेशन सीसीटीव्ही द्वारे मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर त्यांचा शोध लागला. महादेव जाधव सुखरुप असून त्यांना पोलिसांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणले. तेथून जाधव यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.