काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी माता-पुत्रला ईडीने नोटीस बजावली असून राहुल गांधी यांची ईडीकडून तीन तास चौकशी झाली. दरम्यान, याप्रकरणी ईडी चौकशीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गांधी कुटुंबावर मुंबईत पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांची ईडीची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच नॅशनल हेराल्ड ही देशाची संपत्ती असून काँग्रेस व्हिक्टिम कार्ड खेळत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीस म्हणाले, काँग्रेसने जनेतला वेठीस धरले आहे. गांधी कुटुंबाने यंग इंडियन कंपनी सुरू करून त्यावर मालकी प्रस्ताविक केली. तसेच त्यानंतर त्यांनी २ हजार कोटी रुपयांची संपत्ती हडप केली. हा सर्व भ्रष्टाचार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरण हा सर्वात मोठा घोटाळा असून स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न गांधी कुटुंबाने केला असल्याचा आरोप फडणीसांनी केला आहे. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही अवमान केला आहे. मी सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहे. त्यामुळे सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.