ओमायक्रॉन संदर्भात राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
मुंबईतील डोंबिवलीमध्ये ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी हा रुग्ण हाय रिस्क देशातून मायदेशी परतला होता. २४ नोव्हेंबर रोजी हा रुग्ण केपटाऊन शहरातून कल्याण-डोंबिवली येथे आला. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या या तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते.
डोबिंवलीमधील या रुग्णाची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णाला केडीएमसीच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या १४ दिवसांत या रुग्णाची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान या रुग्णाची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रुग्णाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.