गणेशोत्सव जवळ आला कि डॉल्बीच्या परवानगीचा विषय चर्चेत येतो. रात्री दहा पर्यंत नव्हे तर बारा वाजेपर्यंत परवानगी द्या अशी ओरड दरवर्षीच होते. मात्र ‘मी परवानगी देतो आपण एकच पत्र आणा ते ही आईचे किंवा बहिणीचे’ असं सांगत लातूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत भावनिक आवाहन करत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुगली टाकली.
कस्तुराई मंगल कार्यालय व्यासपीठावर लातूरचे पालकमंत्री आमदार खासदार पोलीस अधीक्षक आणि लातूरचे जिल्ह्याधिकारी जी. श्रीकांत यांनी शहरातील अनेक गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलत होते. गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दरवर्षीसारखी याही वर्षी एकच मागणी जोर धरून लावली. ती म्हणजे रात्री दहाची वेळ बारा पर्यंत वाढवून द्या आणि डॉल्बीची परवानगी द्या. यावर अनेक मान्यवरांनी मते मांडली. लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी डॉल्बीला मान्यता देणार नसल्याचं निक्षून सांगितलंय.
पोलीस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना आशा होती जिल्ह्याधिकाऱ्याकडून. मात्र त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि तुम्हाला गणेशोत्सवात डीजे लावायचा आहे, बिनधास्त लावा… जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे हे बोल ऐकून सभागृहात उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. टाळ्यांचा हा आवाज थांबताच जिल्हाधिकारी पुढे बोलू लागले आणि पदाधिकाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं.
“तुम्हाला डीजेची परवानगी देतो. त्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या पत्राचीसुद्धा गरज नाही. केवळ तुम्ही तुमच्या आईचे किंवा बहिणीचे एनओसी सोबत आणा.” या विधानातून ध्वनिप्रदुषणाच्या गांभिर्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. मात्र या विधानामुळे सभागृहात टाळ्यांऐवजी निरव शांतता पसरली.
आपल्या घराच्या आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी ध्वनिप्रदूषण करू नये यासाठी स्वतःच प्रयास करावा. घरच्यांनी परवानगी दिली. तर मगच डॉल्बी लावा, असा सल्ला आपल्य़ा विधानातून त्यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.