Maharashtra Weather Update: थंडीचा जोर कायम; राज्यात किमान तापमानात घट, वरळीत हवेची गुणवत्ता 162

किमान तापमानात घसरण झाल्याने नाशिक, धुळे, निफाडमध्ये तीव्र गारठा जाणवत असून, उत्तर भारतात दृश्यमानता शून्य मीटरपर्यंत घसरली आहे.
Maharashtra Weather Update: थंडीचा जोर कायम; राज्यात किमान तापमानात घट, वरळीत हवेची गुणवत्ता 162

मुंबई: राज्यातील किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे अनेक भागांत थंडीचा जोर वाढला असून, काही ठिकाणी थंडीची लाट जाणवत आहे. उर्वरित महाराष्ट्रातही गारठा कायम आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असली, तरी थंडी पूर्णपणे ओसरणार नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभाग यांनी वर्तवला आहे. दरम्यान, दिवसाच्या कमाल तापमानात मात्र चढ-उतार होत राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातही थंडीची तीव्रता कमी-अधिक होत असून, शुक्रवारी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याच कालावधीत केरळमधील कोट्टायम येथे 36.6 अंश सेल्सिअस इतके देशातील उच्चांकी तापमान नोंदवले गेले. महाराष्ट्रात रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक 35.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.

हेही वाचा: Local Body Election: राज्यातील 23 नगर परिषदा व नगर पंचायतींसाठी आज मतदान; 143 जागांसाठी लढत

मुंबईत हवेत गारवा कायम असून, धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी शहरात मोठ्या प्रमाणावर धुरकट वातावरण पाहायला मिळाले. वरळी परिसरातील उंच इमारती दाट धुक्याच्या पडद्याआड गेल्या होत्या. या भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 162 इतका नोंदवण्यात आला असून, दृश्यता कमी झाल्याचे चित्र होते. नाशिक जिल्ह्यात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू कृषी संशोधन केंद्रात यंदा प्रथमच 5.4 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले. नाशिक शहरात किमान तापमान 7.4 अंशांपर्यंत, तर मालेगावमध्ये 8 अंशांपर्यंत घसरले. 12 डिसेंबरनंतर निफाडमध्ये ही सर्वात कमी तापमानाची नोंद ठरली आहे.

उत्तर भारतात पंजाबपासून बिहारपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली असून, संपूर्ण गंगेच्या मैदानात दृश्यमानता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिल्लीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, ईशान्य मध्य प्रदेश आणि बिहारच्या अनेक भागांत दृश्यमानता शून्य मीटरपर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे.

धुक्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला आहे. पुणे विमानतळावरून गुरुवारी 18 डिसेंबर रोजी उड्डाण करणारी 4 विमाने रद्द करण्यात आली, त्यापैकी 2 विमाने दाट धुक्यामुळे रद्द झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना ऐनवेळी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल आणि किमान तापमान पाहता पुणे 30.1/8.3, अहिल्यानगर 31.1/7.3, धुळे 29.5/5.6, जळगाव 29.5/7.5, जेऊर 32.5/5.5, कोल्हापूर 30.7/14.4, महाबळेश्वर 27.2/12.5, मालेगाव 27.4/8.0, नाशिक 29.7/7.4, निफाड 29.9/5.4 आणि सांगली 31.7/12.3 अंश सेल्सिअस इतके कमाल-किमान तापमान नोंदवले गेले आहे. एकूणच, राज्यासह देशाच्या विविध भागांत थंडी आणि धुक्याचा प्रभाव कायम असून, पुढील काही दिवस नागरिकांसाठी हवामान आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपची कोअर कमिटी जाहीर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version